You are currently viewing गणेशोत्सवाला महागाईचे ग्रहण…तरीही उत्साह कायम..!

गणेशोत्सवाला महागाईचे ग्रहण…तरीही उत्साह कायम..!

विशेष संपादकीय…

*गणेशोत्सवाला महागाईचे ग्रहण…तरीही उत्साह कायम..!*

*भाजीपाला, फळे, फुलांच्या दराबाबत ग्राहकांचा नाराजीचा सूर*

कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गौरी गणेशाचे आगमन होणारा गणेशोत्सव..! दिवाळीचे एवढे अप्रूप नसणारा कोकणी माणूस घरोघरी विराजमान होणाऱ्या बाप्पाचे स्वागत मात्र एखाद्या सोहळ्याप्रमाणे उत्साहात, आनंदात करतो. त्यामुळे कोकणात घरोघरी चैतन्याचे वातावरण असते. बाप्पाच्या स्वागतासाठी घरोघरी विविध देखावे उभारले जातात, माटी म्हणजेच मंडपी(माटवी) सजविण्यात देखील कोणतीही कसूर ठेवत नाहीत. बाप्पाच्या नैवेद्यासाठी सुग्रास जेवण, वेगवेगळ्या भाज्या, मोदक, गोडपोळी, करंज्या, खीर अशा नानाविध गोडधोड पदार्थांची तर रेलचेल असते. आरती, भजनाच्या सुरांनी घरदार, अंगण, पाणंद, अवाट दणाणून जातं. घरची परिस्थिती श्रीमंतीची असो की गरिबी, प्रत्येकजण फक्त आणि फक्त बाप्पाच्या दीड, पाच, सात, नऊ, अकरा तर कुणी २१ दिवसांच्या सहवासासाठी आतुर झालेला असतो.
….परंतु..,
…….गौरी गणपतीच्या या मंगलमय सणावर काही प्रमाणात महागाईचे सावट असल्याचे दिसून येत आहे.. तरीही उत्साह मात्र कायम आहे. मुंबई, पुणे आदी ठिकाणी नोकरी, व्यवसायानिमित्त राहणारे कोकणवासीय मोठ्या संख्येने सिंधुदुर्ग दाखल झाले आहेत, बाजारपेठ गजबजल्या असून, सावंतवाडी सह बांदा निम शहरात गोयकरांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. गणेशोत्सवासाठी फुललेल्या बाजारातील कवंडळ, हरणे, आदी माटवी सामान नेहमीप्रमाणेच चढ्या दराने विकले जात होते पण.., रात्रभर कोसळलेल्या पावसाची धास्ती घेऊन आज शेअर बाजार कोसळतो तशी माटवी सामानाच्या दरात अंशतः घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु भाज्यांचे, फळांचे आणि फुलांचे दर मात्र गगनाला भिडले आहेत त्यामुळे खरेदीदारांच्या तोंडांत सणांच्या नावावर आपलेच लोक आपल्याच लोकांची लूट करतात असा नाराजीचा सूर सर्वत्र ऐकू येत आहे, काही गोरगरीब माणसे तर गरजेपुरता भाजीपाला घेऊन बाजारातून काढता पाय घेत आहेत, तर कुणी वाढलेल्या दरांमुळे मुखातून सुविचारांचा भडिमार करत आहेत. विक्रेते मात्र “हेच आमचे कमाईचे दिवस” असे म्हणत बाजारात चढ्या दराने विकल्या जात असलेल्या सामानामुळे होणाऱ्या ग्राहकांच्या लुटीचे समर्थन करत आहेत…आणि मुंबई पुण्यातून मिळेल तर वाहनाने वाटेल तेवढे पैसे खर्च करून गावी गणेशोत्सवासाठी आलेले कोकणवासीय “सगळे एकाच माळेचे मणी” म्हणत वाढलेल्या महागाईवर तिखट प्रतिक्रिया देत आहेत.
यावर्षी कडधान्ये, तांदूळ इत्यादी घरगुती सामानाचे दर आवाक्यात राहिले आहेत किंबहुना अंशतः कमी झालेले असून तेलाचे दर मात्र स्थिर आहेत हीच काय ती ग्राहकांची दृष्टीने जमेची बाजू आहे. त्यामुळे “कहीं खुशी कही फशी” अशी एकंदर परिस्थिती आहे. बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाचे योग्य नियोजन केल्याचे पहायला मिळत असून वाहतूक कोंडीचा प्रश्न राहिलेला दिसून येत नाही..गणेशोत्सवाचा बाजार म्हणजे गणेशोत्सवपूर्व चार दिवस ग्राहकांची धावपळ असते पण…यावर्षीचा बाजार केवळ एकच दिवस काही प्रमाणात भरलेला दिसला.. बाजारपेठेत दरवर्षी खरेदीसाठी होणारी ग्राहकांची तोबा गर्दी मात्र यावर्षी पडलेल्या शेअर बाजारात जशी लाल निशाणे दिसतात तशी कमी झालेली गर्दी म्हणजे वाढत्या महागाईचा प्रभाव म्हणायला नक्कीच काही हरकत नसावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा