You are currently viewing धबधब्यांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी! गोवा सरकारने निर्बंध उठवले

धबधब्यांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी! गोवा सरकारने निर्बंध उठवले

*धबधब्यांवर पुन्हा पर्यटकांची गर्दी! गोवा सरकारने निर्बंध उठवले*

*निसर्गसंपत्तीचे जतन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन*

*पणजी, २६ ऑगस्ट:*

मान्सूनच्या सुरूवातीला नैसर्गिक आपत्तीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व धबधबे, खाणींचे खंदक, नद्या, तलाव आणि अन्य जलस्रोतांमध्ये नागरिकांनी प्रवेश करण्यावर आणि पोहण्यावर बंदी घालण्यात आली होती.

मात्र गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत दिलासादायक निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी दिलेल्या निर्देशानुसार, राज्याच्या वन विभागाने गोव्यातील धबधब्यांच्या भेटीवर कोणतेही निर्बंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. गोवा वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या दूधसागर, मैनापी, सावरी आणि पाली यांसारख्या प्रसिद्ध धबधब्यांवर पर्यटकांसाठी सर्व आवश्यक सुविधा आणि सुरक्षा उपाययोजना उपलब्ध असल्याचे म्हटले आहे.

*जबाबदार पर्यटनाची ग्वाही*
गोव्यात धबधब्यांना भेट देण्यावर कोणतेही बंधन नाही. फक्त सर्वांनी हवामान परिस्थितीबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे. धबधब्यासारख्या पर्यटनस्थाळी सहलींचे नियोजन करताना आयएमडीच्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. वन विकास महामंडळ हे गोव्यच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्यास आणि त्याचबरोबर जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध आहे. स्थानिक लोकांच्या आणि पर्यावरणाच्या हिताचे रक्षण करत, पर्यटन व्यवसायाला चालना देणे हे आमचे ध्येय आहे. यामुळे पर्यटकांना निसर्गाच्या जवळ येण्याची संधी मिळेल आणि नैसर्गिक वारसा जपण्यासही मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे.

*दुर्घटनेचे प्रमाण वाढते:*
पावसाळ्यात, धबधबे आणि नद्यांमधील पाण्याची पातळी वाढते आणि प्रवाह वेगवान होतो. जुन्या खाणींमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले असते, जे धोकादायक ठरु शकते. अशा ठिकाणी पोहताना किंवा अंघोळ करताना बुडण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होते, त्यासाठी सरकारने धबधब्यांवर जाण्यास मनाई केली होती. .

प्रतिक्रिया व्यक्त करा