शिवापुर ते दुकानवाड परिसरातील रस्ते आणि ब्रिज सुस्थितीत
आमदार निलेश राणे यांच्या तत्परतेची जनतेकडून प्रशंसा
कुडाळ
शिवापुर, वसोली, दुकानवाड, आंजीवडे, उपवडे या पंचक्रोशीतील नागरिकांनी आमदार निलेश राणे यांची कार्यतत्परता अनुभवली आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर ब्रिजवरील खड्डे बुजवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. शिवापुरपर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी व गवत साफ करून रस्ता मोकळा करण्यात आला.
गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच श्री गणेशाच्या स्वागतासाठी प्रशासन सक्रिय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सततच्या पावसामुळे ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडले होते. गणेश भक्तांच्या गैरसोयीचा विचार करून आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासनानेही शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी काम पूर्ण करून गणेश भक्तांसाठी वाहतूक सुरळीत केली.
शिवापुर ग्रामपंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांनी या समस्यांची माहिती आमदार राणे यांच्यापर्यंत पोहोचवली. याची तातडीने दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण करण्यात आले.
या कामांमुळे पंचक्रोशीतील जनतेत समाधानाचे वातावरण असून, अनेकांनी आमदार राणे यांचे आभार मानले आहेत.

