गणेशप्रसाद गवस पुन्हा दोडामार्ग तालुका प्रमुखपदी; शैलेश दळवी यांची उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती
दोडामार्ग –
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजू परब यांनी नुकतीच जिल्ह्यातील विविध तालुक्यांची कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये दोडामार्ग तालुका प्रमुखपदी पुन्हा एकदा गणेशप्रसाद गवस यांची फेरनिवड करण्यात आली आहे. गवस हे झोळंबे गावचे रहिवासी असून, त्यांनी यापूर्वीदेखील या पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
गणेशप्रसाद गवस यांची पक्षाप्रती असलेली निष्ठा, तालुक्यातील गावागावांमध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासाठी केलेली मेहनत आणि आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत निवडणुकांमध्ये त्यांच्या अनुभवाचा उपयोग होईल, याची दखल घेत पक्षश्रेष्ठी व जिल्हाप्रमुख संजू परब यांनी त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना गवस म्हणाले, “येणाऱ्या निवडणुकांत सर्वांना सोबत घेऊन पक्षासाठी आवश्यक ते सर्व काम केले जाईल. शिवसेना तालुक्यात प्रथम क्रमांकावर येईल, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल.”
दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणारे शैलेश सुरेश दळवी यांची आता उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर राजेंद्र निंबाळकर यांनाही पुन्हा उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दोघांनीही पक्षाच्या कामासाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही दिली आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना (शिंदे गट) अधिक मजबूत पावले उचलत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
