*येता का बोला*
हाती चहाचा पेला अन बाहेर पाऊस ओला
भजी गरम कांद्याची, तुम्ही येता का बोला
करू पावसाळी गप्पा, गाऊ पाऊस गाणी
बालपणीच्या पावसाची, आठवू कहाणी
अजून तोच पावसाळा, तोच आहे पाऊस
आपण फक्त मोठे झालो, विसरलो हौस
पुन्हा पावसात सोडू, आपण कागदी होडी
एकमेकां भिजवून करू, बाल खोडी
चिखलात रोवू पाय, मातीचा धुंद स्पर्श
मोठेपणी टिपून घेऊ,
तोच बाल हर्ष
निरागस भिजण्याचा घेऊ अनुभव पावसाच्या थेंबाची चाखू, गोड चव
अंगावर लेवू पाऊस, विसरून भान
आजही तो आपल्याला, करेल लहान
बंद दार मनातले, हळूचकन खोला
वाट पाहतोय आपली, बाहेर पाऊस ओला.

