सिंधुदुर्गमध्ये अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका!
मटका, दारू, गुटख्याच्या अड्ड्यांवर पोलीस छापे – अनेक अटकेत
सिंधुदुर्गनगरी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका जुगाराविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथे थेट कारवाई करत छापा टाकल्यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. या धडक कारवाईनंतर जिल्हाभरात अवैध मटका, दारू, गुटखा विक्रीवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू झाली आहे.
जिल्ह्यात दररोज होणारा लाखो रुपयांचा आर्थिक चुराडा थांबवण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम उघडली असून, कणकवली पोलीस निरीक्षकाच्या निलंबनामुळे या कारवाईला आणखी गती मिळाली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांमार्फत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात छापे सुरू असून, अनेक संशयितांविरोधात गुन्हे दाखल करून अटक केली जात आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन, “माझ्या सिंधुदुर्गात बेकायदेशीर धंदे खपवून घेणार नाही,” असा स्पष्ट संदेश दिला आहे. त्यांच्या सूचनेनुसार, पोलिसांकडून चरस, गांजा यांसारख्या नशेच्या पदार्थांवरही कारवाई केली जात असून, भावी पिढीचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत असून, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी अटकसत्र सुरू असल्याची माहिती दिली आहे.
मुख्य मुद्दे:
कणकवलीतील मटका अड्ड्यावर पालकमंत्र्यांचा छापा
जिल्हाभरात पोलिसांचे छापे, नाकाबंदी आणि अटकसत्र
लाखो रुपयांचा बेकायदेशीर उलाढालींना ब्रेक
पोलीस निरीक्षकाचे निलंबन, कारवाईला मिळाली गती
नशेच्या रॅकेटवरही लक्ष केंद्रीत
पालकमंत्री नितेश राणे यांच्या थेट कृतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळल्या जात असून, ही मोहीम भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांकडून मिळत आहेत.
