सावंतवाडीत मटका, दारू, जुगारावर कारवाई होणार का?- आशिष सुभेदार
– शिवसेना (उबाठा) कडून पालकमंत्री नितेश राणेंना सवाल
कणकवली येथे सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यांवर थेट धाड टाकत पालकमंत्री नितेश राणे यांनी कारवाई केल्याने प्रशासनाला जाग येत ठोस पावले उचलावी लागली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून तिचे स्वागतही करण्यात येत आहे. मात्र ही कारवाई फक्त कणकवलीपुरती मर्यादित राहणार का, की सावंतवाडी आणि इतर तालुक्यांमध्येही होणार, असा थेट सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आशिष सुभेदार यांनी केला आहे.
सुभेदार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सावंतवाडी तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणावर दारू अड्डे, मटका कंपन्या, जुगार अड्डे आणि इतर अवैध धंदे सुरू आहेत. विशेष म्हणजे काही मटका कंपन्या आणि अड्ड्यांवर सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांचेच वरदहस्त असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पालकमंत्री राणे हे आपल्या पक्षातीलच लोकांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सावंतवाडी हा गोव्याच्या सीमेवरील तालुका असून, येथून मोठ्या प्रमाणावर दारू वाहतूक, अमली पदार्थ विक्री, वाळूची चोरटी वाहतूक आणि कर्नाटकात जाणारी बेकायदा दारूची तस्करी सुरू आहे. वारंवार तक्रारी करूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सुभेदार यांनी म्हटले आहे.
कणकवली येथील कारवाई नक्कीच स्तुत्य असून त्याचे कौतुक व्हायलाच हवे, पण ती कारवाई संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रभावीपणे लागू झाली पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. सावंतवाडीतही अशाच पद्धतीने धाड टाकून कारवाई केली जावी, अशी मागणी करत सुभेदार यांनी राणेंना थेट आव्हान दिले आहे की, “स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस दाखवा!”
