पालकमंत्री राणेंच्या इशाऱ्यानंतर कणकवलीचे निरीक्षक अतुल जाधव निलंबित
सिंधुदुर्ग :
जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीतील मटका बुक्की घेणारे घेवारी याच्या बंगल्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर पत्रकार परिषदेत पोलिसांवर कारवाई होणार असल्याचा इशारा दिला. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कणकवलीचे पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री राणे यांनी या प्रकरणी दोषी तिघेजण घरी जाणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे आता निरीक्षक जाधव यांच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कणकवलीत मटका बुक्कीवर कारवाई झाल्यानंतर गुन्हा दाखलही झाला होता. पालकमंत्र्यांनी स्वतः धाड टाकून कारवाई केली होती. मात्र त्यानंतर पोलिस निरीक्षक जाधव यांना याची माहिती देऊनही त्यांनी घटनास्थळी पोहोचण्यास वेळ घेतला होता. त्यानंतरच ही कारवाई केली.
पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले की, ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असतील तर त्या अधिकाऱ्यांनीच कारवाई करावी, अन्यथा मी स्वतः धाड टाकणार. त्यांच्या या इशाऱ्यानंतर लगेचच कणकवली पोलिस निरीक्षकांचे निलंबन झाले असून यामुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांना कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा प्रशासकीय पाठबळ मिळणार नाही, तसेच अशा धंद्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी आणि इतर यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, सायंकाळी उशिरा पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांचे निलंबन करण्यात आले आहे.

