महसूल मासानिमित्त प्रशासनातील दीपस्तंभ
शीतल उगले कला पदवीधर झाली कलेक्टर
अहिल्यानगर येथील शीतल उगले यांची गोष्ट जरा वेगळी आहे. वडील अहिल्यानगरच्या सुप्रसिद्ध अहमदनगर जिल्हा मराठा समाज प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये भूगोल विषयाचे प्राध्यापक. शीतलने आय ए .एस. करायचे ठरविले होते. त्यामुळे तिने कला शाखेची निवड केली होती. बी.ए.ची पदवी मिळाली. आय. ए .एस बरोबर भूगोलामध्ये एम.ए. करावे असे तिला वाटले. वडील भूगोलाचे प्राध्यापक असल्यामुळे वडिलांपासूनच तिने प्रेरणा घेतली असावी.
पण भूगोलात एम ए करीत असताना शीतलच्या लक्षात आले की आय ए एस चा अभ्यास व एम ए भूगोलाचा अभ्यास सोबत करणे थोडे कठीणच आहे. तिला तर आयएएस व्हायचे होते त्यामुळे तिने निर्णय घेतला आणि भूगोलामध्ये एमए करण्याच्या निर्णय स्थगित केला. तिच्या या निर्णयामुळे तिला आयएएस या परीक्षेकडे पूर्ण वेळ लक्ष केंद्रित करता आले. आणि जेव्हा आयएएस चा निकाल लागला तेव्हा एक बीए पदवीधर असलेली मुलगी शीतल उगले ही कलेक्टर झाली.
शीतल ज्या काळात बीए करीत होती तो काळ थोडा वेगळा होता. त्या काळात साधारणपणे आय ए एस करणारी मुले बी ए कडे वळायची. त्याचा त्यांना फायदा व्हायचा. कारण की कला शाखेतील विषय हे आयएएस या परीक्षेच्या उपयोगात पडणारे आहेत. पण आता मात्र चित्र बदलले आहे. डॉक्टर इंजिनियर सारख्या वेगळ्या क्षेत्रातील लोक आय ए एस करायला लागले आहेत. यामध्ये आयआयटी पास झालेल्या मुलांचाही समावेश आहे.
आय ए एस चा निकाल लागल्यानंतर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी आयएएस झालेल्या मुलांच्या भेटीला निघालो. मी अहिल्या नगरला पोहोचलो. तिथे माझे न्यायमूर्ती मित्र राहतात. न्यायाधीश श्री चंद्रचूड गोंगले हे त्यांचे नाव. त्यांना शीतल उगलेचा पत्ता विचारला. ते आमच्या गाडीत बसले व मला शनी चौकातील उदय एजन्सीमध्ये घेऊन गेले. उदय एजन्सीज आणि श्रीपाद ग्रंथ भांडार ही अहिल्यानगर मधील पुस्तकांची प्रतिष्ठित बुक डेपो आहेत. तिथले कुलकर्णी हे मालक आहेत त्यांना शीतलबद्दल विचारले. तर ते म्हणाले मला त्यांचे घर माहीत आहे.
आम्ही कुलकर्णी सरांना सोबत घेतले आणि शीतल उगले मॅडमचे घर गाठले. घरी शीतलची आजी व शीतलची आई होती. त्यांनी आमचे स्वागत केले. वडील महाविद्यालयात गेले होते आणि शीतल ही बाहेरगावी होती. मी शीतलला फोन लावला आणि अमरावतीला तिच्या सत्कार ठेवला आहे असे फोनवरून निमंत्रण दिले. तिने ते फोनवरूनच स्वीकारले आणि अमरावतीला नक्की येते अशी आश्वासनही दिले.
अमरावतीला शैक्षणिक हब असलेल्या गाडगे नगर परिसरातील नागपूर रोडवरील वराडे मंगल कार्यालयात शीतलच्या सत्कार झाला. सत्काराला विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यावेळेस इंटरनेट फेसबुक व्हाट्सअप याचा एवढा बोलबाला नव्हता. त्यामुळे सभागृह तुडुंब भरले होते. शीतल बोलत होती. मुले ऐकत होती. अनेक मुले टिपण काढत होती. एक कला पदवीधर असलेली मुलगी आयएएस होऊ शकते म्हणजे एक आगळीवेगळी गोष्ट होती. कार्यक्रम आटोपला. आम्ही शीतलबरोबर जेवण घेतले. सोबत यूनीक अकादमीचे श्री अमोल पाटील हे पण होते.
शीतल आता वेगळ्या ठिकाणी काम करून सध्या पुणे येथे क्रीडा विभागाची व्यवस्थापकीय संचालक म्हणून स्थिरावली आहे. सुरुवातीला उमरेड या भागात म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये असताना आम्ही एका कार्यक्रमाला त्या भागात गेलो होतो .आम्ही आवर्जून शीतलची विश्राम भवनात भेट घेतली. चहापान गप्पागोष्टी झाल्या. पुढे शीतल रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाली. तिथे जी जिल्हाधिकारी असताना नदीला मोठा पूर आला. नदीमध्ये एक बस वाहून गेली आणि ही घटना मध्यरात्रीची. एक चांगला जिल्हाधिकारी कसा असू शकतो तो किती तत्परतेने काम करू शकतो हे यावेळी शीतलने दाखवून दिले. तिच्या या कामाचा गौरवही झाला
पुढे शीतल सोलापूर महानगरपालिकेला आयुक्त म्हणून आली .तेव्हा माझे मित्र उपायुक्त श्री महेबूब कासार यांच्याबरोबर मी दोनदा तिची भेट घेतली .मी तिच्या वडिलांच्या सतत संपर्कात असतो. शीतल आयएएस अधिकारी असल्यामुळे साहजिकच वेळ कमी भेटतो. त्यातील क्रियाशील कर्तव्यतत्पर जे समाजाभिमुख सामाजिक बांधिलकी ठेवणारे अधिकारी आहेत .त्यांना तर सतत व्यस्त राहावे लागते.
आपल्या मुलीबरोबर इतरही मुलं-मुली कलेक्टर व्हावीत .स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचे करिअर घडवावे. यासाठी तिचे वडील सेवेत असताना मला वारंवार त्यांच्या अहमदनगर मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध महाविद्यालयात सातत्याने निमंत्रित करीत होते. हे महाविद्यालय फार मोठे आहे. या महाविद्यालयात विद्यार्थी संख्या 11000 आहे. महाराष्ट्रातील प्रचंड विद्यार्थी संख्या असलेले हे दुसरे महाविद्यालय आहे .पहिला क्रमांक नाशिकच्या मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयाला जातो. तेथे 16000 विद्यार्थी एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
आज शीतल वेगवेगळ्या डिपारमेंटमध्ये सहभागी होऊन आता क्रीडा क्षेत्रासारख्या समाजाभिमुख क्षेत्राकडे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी तिने काम केले ते निश्चितच समाजाभिमुख व सामाजिक बांधिलकी जपणारे होते आणि म्हणूनच प्रशासनामध्ये शीतल उगलेसारखे जर प्रशासनातील खऱ्या अर्थाने दीपस्तंभ उभे झाले तर या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याशिवाय राहणार नाही. महसूल मासानिमित्त शीतल उगले यांना हार्दिक शुभेच्छा
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003

