‘श्रीकृष्ण केशव पुराणिक’ हे माझे प्राथमिक शाळेतील शिक्षक. मी इयत्ता सहावीत असताना ते आमच्या शाळेत आले. त्या काळातले ते तरुण मुख्याध्यापक होते. एम्. ए. शिकले होते.
त्यांनी मला बराच गोष्टी शिकवल्या, पण महत्त्वाचे म्हणजे वाचन शिकवलं. ते त्यावेळी आपल्या मुलींसाठी ‘किशोर’ मासिक विकत घेत असत. त्यानी वाचलं की मला वाचायला देत असंत. त्यातली कोडी सोडवायला सांगत. एकदा चित्रबोध- शब्दशोध मधील एक कोडं मला पूर्ण सुटलं. ते म्हणाले ,”आपण हे संपादकाकडे पाठवून देऊया.” तसे त्यानी केलंही. त्यानंतर माझं नाव किशोर मासिकात छापून आलं. त्याकाळात ते माझ्यासाठी अप्रूप होतं, पण मला हे माहितीच नव्हतं. माझ्या मुंबईतल्या आतेभावाने मला पत्र पाठवून कळवलं. गावात राहून मी काही करतो, याचं त्याना कौतुक वाटलं होतं. अर्थात पुढे मग मीही ते अंकामध्ये बघितलं.
मी एस्. वाय. बीएस्सी. ला होतो, त्यावेळी एक गंमत झाली. एकदा कॉलेजमधून घरी येत असताना माझ्या गाडीत गुरुजी होते. गुरुजींनी मला विचारलं, “सध्या कोणतं पुस्तक वाचतोस?” मी पुस्तकाचं नाव सांगितलं. मला म्हणाले,”छान. वाचतोयस आणि खरंही बोलतोयस.” मी म्हटलं ,”का? असं का म्हणालात?” ते म्हणाले, “अरे, हे पुस्तक तू वाचतोस, हे मला आधीच माहिती होतं.” मी म्हटलं,” कसं?” ते म्हणाले, “मी शिरोड्याच्या वाचनालयात जाऊन तू कोणती पुस्तके वाचतोस, हे देवघव रजिस्टर मध्ये मी पहात असतो. परवाच्या दिवशीच मी बघितलय, हे पुस्तक तू घेऊन गेलास.” मी चमकलो; कारण एक शिक्षक आपल्यामागे असा सावलीसारखा धावत असेल, याची मला कल्पनाच नव्हती. त्यानंतर पुढील आयुष्यात मी एक गोष्ट जपली, वाचनालयातून नेहमीच दर्जेदार पुस्तके नेण्याचा प्रयत्न केला.
पाच वर्षापूर्वी माझ्या शब्दाला मान देऊन ते आमच्या शाळेच्या एका समारंभात मुद्दाम आले होते. बहुधा तिच त्यांची शेवटची भेट.
माझ्या जडणघडणीत अनेक गुरुजनांचा हात आहे, त्यापैकी हे एक प्रमुख शिक्षक. त्यानी अनेक गोष्टी मला शिकवल्या. मी त्यांचा ऋणी आहे.
गुरुजींचं आत्ताच ९० व्या वर्षी निधन झालंय. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🙏🏻
विनय सौदागर
आजगाव, सावंतवाडी
9403088802

