“सिंधुदुर्गात अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू – नितेश राणेंचा इशारा : दर आठवड्याला धाडसत्र होणार
कणकवली
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली असून, कणकवलीतील मटका जुगार अड्ड्यावर थेट धाड टाकून कारवाईचा प्रारंभ केला आहे. अवैध मटका, दारू, अंमली पदार्थ, वाळू माफिया यांच्यावर आता टप्प्याटप्प्याने कारवाई होणार असून, दर आठवड्याला धाडसत्राच्या माध्यमातून कारवाईची ‘ब्रेकिंग न्यूज’ देणार असल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
शासकीय पाठबळ असल्यास सस्पेंड करणार – राणेंचा सज्जड इशारा
“कोणताही अधिकारी – मग तो पोलीस असो, महसूल विभागातील असो किंवा इतर शासकीय कर्मचारी असो – जर अवैध धंद्यांना पाठबळ देत असेल तर त्याला थेट सस्पेंड करण्यात येईल,” असा ठाम इशारा राणेंनी दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “वेळीच सावध व्हा, अन्यथा नोकरी गेल्यावर मलाच दोष देऊ नका.”
नऊ महिन्यांची संधी दिली, तरीही कारवाई नाही – धाड टाकावी लागली
राणे म्हणाले की, पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच जिल्ह्यातील मटका, जुगार, गांजा अड्ड्यांवर कारवाईचे आदेश पोलिसांना दिले होते. “नऊ महिने वाट पाहिली, पण अपेक्षित कारवाई न झाल्याने मीच थेट धाड टाकली,” असे त्यांनी सांगितले.
गांजा विक्री करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित – हरकुळ, सावंतवाडी टार्गेटवर
राणेंनी सावंतवाडी रेस्ट हाऊसच्या मागील परिसर, खारेपाटण चेकपोस्ट, हरकुळ बुद्रूक व इतर ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याचे स्पष्ट करत, त्या ठिकाणच्या कारवाईची तयारी दर्शवली आहे. “कोण गांजा विकतो, कोण ओढतो, कोणी संरक्षण देतो – सर्व पुरावे माझ्याकडे आहेत,” असेही ते म्हणाले.
“हप्ता” वाढवण्याचे आरोप – तरीही मी गप्प राहिलो
पोलीस खात्यातील काही अधिकाऱ्यांनी हप्त्याची रक्कम वाढवण्याचा प्रयत्न केला, असे आरोप करत राणेंनी सांगितले की, कोणत्या रंगाच्या इन्व्हलपमध्ये किती नोटा दिल्या जातात यापर्यंतची माहिती त्यांच्याकडे आहे. तरीही त्यांनी पोलिसांना संधी दिली, पण अखेर स्वतः धाड टाकावी लागली.
“कारवाई करा, नाहीतर बदली किंवा सस्पेंड ठरलेलं”
सिंधुदुर्गातील गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस, महसूल विभाग हे काय करतात याची मला माहिती आहे. कारवाई न झाल्यास संबंधितांवर कारवाई होईल, आणि त्यावेळी कोणताही अधिकारी रडू नये, अशी ठाम भूमिका राणेंनी मांडली.
“माझे वडील नारायण राणेंनी तरुणांना व्यसनांपासून वाचवलं..
राणेंनी आपले वडील आणि खासदार नारायण राणेंच्या कार्याचा दाखला देत सांगितले की, त्यांनी सिंधुदुर्गातील तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवले. “मी त्यांचाच मुलगा आहे, हे अवैध धंदे करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं,” असा इशाराही त्यांनी दिला.
सार्वजनिक जबाबदारीचं भान ठेवावं – सर्व यंत्रणांना राणेंचं आवाहन
पत्रकार, पोलिस, महसूल अधिकारी, प्रशासन – सर्वांनीच आपल्या भूमिकेची जबाबदारी पार पाडावी, अन्यथा संपूर्ण युवा पिढी बिघडण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा देत राणेंनी समाजाच्या सर्व घटकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

