*लेखिका कवयित्री पत्रकार मेघा कुलकर्णी “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*झरा मायेचा आणि ज्ञानाचा*
खरं तर अशावेळी नि:शब्द व्हायला होतं, आजी-आजोबा नातवंडांच आवडत स्थान. दिनांक ११ ऑगष्ट रोजी भ्रमणध्वनीवर नातेवाईकांकडून संदेश आला, कोल्हापूरच्या आजींचे संध्याकाळी साडेसहा वाजता निधन झाले. प्रदीर्घ आजार आणि वृद्धापकाळ असे जरी असले तरी माया अतूट असते. पुढचा तासभर काही सुचत नव्हते, स्वतःला सावरत रहाणे एवढेच काय ते आपल्या हाती. बालपणीच्या अनंत आठवणींचा पट उलगडला. वडिलांच्या मावशी तसेच आईला सून न मानता लेकीप्रमाणे प्रेम देणारी ही आजी. अशी नाती पहायला मिळणेही आता दुर्लभ झाले आहे. आजीचे मराठी भाषेवर प्रचंड प्रेम रोजच्या रोज पेपरातील शब्दकोडे सोडवणे हा छंद, कोडे सोडवल्याशिवाय झोप येणार नाही. कोणतीही, कला-लेखन, अभ्यासाच्या प्रगतीबद्दल दाद मिळायची. हा मायेचा झरा अखंड खळाळताना पाहिला आहे, मनांपासून हसत हसत चर्चा करत मराठीतले अनेक शब्दांची ओळख इथेच झाली.
अनंत आठवणी सोबत आहेत पण ही एकमात्र अविस्मरणीय अशी आहे. दिनांक ०९ ऑगष्ट २०१९ या दिवशी माझा पहिला कथासंग्रह ‘स्नेहांकूर’ च्या प्रती घरी आल्या, त्याच दिवशी मी आजी-आजोबांना हे सांगितले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरगुती स्वरूपांत कथासंग्रह प्रकाशित झाला. उभयतांचे आशीर्वाद या पुस्तकांला लाभले, महापूराने कोल्हापूरला वेढले होते, पुणे – बंगलोर हायवे बंद होता. ना पती येऊ शकले – ना भाऊ भावजय. कोणतीही नवीन गोष्ट शिकली की त्यांना जाऊन सांगायची घाईगडबड असायची. दोघेही वारेमाप कौतुक करत, पाठीवर मिळालेली शाबासकी आणि मायेने फिरवलेला हात कधीच विसरू नाही शकत. मोठे झाल्यावर वेगवेगळ्या शहरांत रहाताना कोल्हापूर भेटीत या दोघांकडे जाणे म्हणजे आनंदाचे सुखनिधान. शालेय जीवनांत तर घरी दफ्तर टाकले आणि आई वडिलांनी सांगितले कि आजीकडे जायचे आहे तर, लगेच हात-पाय-तोंड धुऊन विनातक्रार दूध पोटात जायचे. संध्याकाळचा दडप्या पोह्यांचा नाष्टा त्यानंतर सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला जायचा. गप्पा मारता मारता रात्रीचे साडेदहा-अकरा कधी वाजायचे ते कळतही नव्हते.
आज सगळे दूरवर आहोत. सोशल मीडिया वर संपर्क असतो प्रत्येकाचा. पण हा सगळयांना जोडणारा धागा मात्र आता आपल्यासोबत नाही याचे राहून राहून वाईट वाटते. केलेले स्वागत, झालेले संस्कार हा मोलाचा ठेवा जतन करणे हीच आयुष्याची देणगी आहे. भाग्यवान आहे आमची पिढी अशी एकत्रित नाती पहायला मिळाली. निर्व्याज्य प्रेमाची अनुभूती मिळाली. थोड्या शब्दांत या आठवणी सांगणे लिहिणे खूप अवघड आहे. माणुसकीचे नाते जपणाऱ्या आपल्या कोल्हापूरांतील हा मायेचा ओलावा शोधूनही सापडणार नाही. समस्त कुलकर्णी-कोल्हटकर परिवारातर्फे सौ. सुहासिनी दत्तात्रय जोशी (आजीस) विनम्र अभिवादन
©मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२

