आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर यांची उपस्थिती, कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव
सावंतवाडी :
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा ५२ वा वाढदिवस सावंतवाडीतील मँगो हॉटेलच्या सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर तसेच आमदार निलेश राणे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी दोन्ही आमदारांनी परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं कौतुक केलं.
केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला असून या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यात शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संजय पडते, महिला आघाडी अध्यक्षा ॲड. नीता कविटकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विधायकर परब, तालुका प्रमुख बबन राणे, नितीन मिर्जेकर, गजानन गावस, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, उपजिल्हा प्रमुख झेवियर फर्नांडिस यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांच्यात चांगले नेतृत्त्व असून राजकारणात त्यांचे उज्ज्वल भविष्य आहे, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी थोडा संयम ठेवल्यास ते खूप पुढे जातील, असेही केसरकर म्हणाले.
तर आमदार निलेश राणे म्हणाले, “संजू परब म्हणजे माझा माणूस. आमचं नातं जीवाभावाचं आहे. राजकारणात माझं नाव कधीही खाली पडू नये यासाठी परब स्वतः बदनाम होणे स्वीकारतात, पण माझी बदनामी कधी होऊ देत नाहीत. त्यांची ही निष्ठा अनमोल आहे”.
यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, सचिन वालावलकर, सुनील राऊळआदींनी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, संजू परब यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, “मला आमदारकी मिळो वा न मिळो, पण निलेश राणे यांचा माझ्या डोक्यावरचा आशीर्वाद कायम राहावा हीच माझी इच्छा आहे. तसेच आमदार दीपक केसरकर यांच्यासोबत काम करताना मला वेगळ्याच उमेदीने काम करण्याची प्रेरणा मिळते”.
संपूर्ण कार्यक्रमात संजू परब यांच्या नेतृत्वावर विश्वास, त्यांचे कार्य आणि त्यांना मिळालेलं कार्यकर्त्यांचं प्रेम याचा प्रत्यय सर्वांना आला. यावेळी शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत संजू परब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.
