You are currently viewing छायाचित्रकार म्हणजे बातमीला जिवंत करणारा कलाकार : तहसीलदार श्रीधर पाटील

छायाचित्रकार म्हणजे बातमीला जिवंत करणारा कलाकार : तहसीलदार श्रीधर पाटील

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सावंतवाडी पत्रकार संघातर्फे छायाचित्रकारांचा सन्मान

 

पत्रकार आणि छायाचित्रकार हे नातं श्रीकृष्ण अन् अर्जूनासारखं

 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

बाळशास्त्री जांभेकर यांचा वारसा जपण्याच काम पत्रकारांसह छायाचित्रकारही करत आहेत. पत्रकार आणि छायाचित्रकार हे नातं श्रीकृष्ण अन् अर्जूनासारख आहे. बातमीला जिवंत करण्याचे काम छायाचित्रकार करीत असतो. कारण, छायाचित्रण ही फक्त एक कला नसून ती एक अशी भाषा आहे, जी शब्दांशिवाय अनेक गोष्टी व्यक्त करते. एक छायाचित्र हजारो शब्दांचे बोलके रूप असते. आजच्या डिजिटल युगात आपल्या सर्वांच्या हातात कॅमेरा आहे. यामुळे प्रत्येकजण छायाचित्रकार बनू शकतो. पण एक खरा छायाचित्रकार तो असतो, जो फक्त चांगला फोटो काढत नाही, तर त्यामागील भावना लोकांना समजून घेण्यास मदत करतो, असे प्रतिपादन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.

जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने आयोजित ‘छायाचित्रकार सन्मान सोहळ्या’ च्या अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते छायाचित्रकार गणेश हरमलकर, सतीश हरमलकर, जतीन भिसे, अजित दळवी, रोहित कशाळीकर, व्हिडिओग्राफर साहील दहीबावकर, कौत्सुभ मुंडये, साबाजी परब, अनुजा कुडतरकर, भुवन नाईक यांना भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आज एआयच्या जमान्यात फोटो पायरसीसारखे प्रकार होतात. त्यामुळे आपला वॉटरमार्कचा उपयोग कसा करता येईल याचा विचार करावा. आजही वृत्तपत्र वाचताना छायाचित्रामुळे बातमी जिवंत होते. आजची आव्हान लक्षात घेता ज्येष्ठ, अनुभवी छायाचित्रकांराचं मार्गदर्शन युवा पिढीला मिळाव यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी यावेळी सुचवले.

पत्रकार दिनाप्रमाणे छायाचित्रकार दिन तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. छायाचित्रकाराची ताकद काय असते याचा अनुभव संपूर्ण विश्वाला आहे. कॅमेरा किती महाग आहे यापेक्षा छायाचित्रकाराची दृष्टी महत्वाची असते. पत्रकारांच्या बातमीला वजन प्राप्त करून देण्याचे काम छायाचित्रकार करतात त्यामुळे आजच्या डिजिटलच्या युगात देखील पत्रकारिता क्षेत्रात छायाचित्रकार तेवढाच महत्त्वाचा आहे, असे मत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांनी व्यक्त केले.

आजचा दिवस आमचा आहे. आमचा सन्मान केलात यासाठी तुम्हाला धन्यवाद देतो. छायाचित्रकारांवर तुमचं असणार प्रेम प्रेरणादायी आहे. यातून आम्हाला अधिक काम करण्याची उमेद मिळेल अशा शब्दांत छायाचित्रकार अजित दळवी यांनी उपस्थित छायाचित्रकारांच्यावतीने सन्मानाला उत्तर देताना आभार व्यक्त केले.

यावेळी जेष्ठ छायाचित्रकार गणेश हरमलकर, माजी तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हेमंत मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर, प्रास्ताविक व सूत्रसंचालन सहसचिव विनायक गांवस तर आभार जेष्ठ पत्रकार राजेश नाईक यांनी मानले.

याप्रसंगी पत्रकार रूपेश हिराप, नरेंद्र देशपांडे, प्रा. रुपेश पाटील, नागेश पाटील, निखिल माळकर, साबाजी परब, जतिन भिसे, अजित दळवी, कौस्तुभ मुंडये, अनुजा कुडतरकर, सतीश हरमलकर, रोहित कशाळीकर, भुवन नाईक, संतोष परब यांच्यासह अन्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा