You are currently viewing मी आणि छत्री

मी आणि छत्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम ललित लेख*

 

☂️ *मी आणि छत्री* ☂️

 

येरे येरे पावसा तुला देते पैसा…

हे बोलायला लागलो तेव्हापासूनचं आठवणीतील बडबडगीत…

तेथपासून पाऊस आणि छत्रीचं घट्ट नातं कळू लागलं…

अगदी छोट्टीशी रंगीत,फुलाफुलांची इटुकली छत्री

नातीला आणताच तिला कित्ती आनंद झाला‌‌ व कधी एकदा पाऊस येतो असं तिला झालं होतं…पावसाशिवाय मजाच नाही छत्रीची…तिचा आनंद बघताना मला मीच इवलीशी दिसू लागले..शाळेत असतांना दुसरी

तिसरीतच असेन..एक सुंदर ,प्रत्येक कळी वेगळ्या रंगाची असलेली छोटी छत्री बाबांनी माझ्या हट्टापायी आणली..

शाळेत नेली,,आणि आनंदून गेले कारण जोराचा पाऊस आला..लगेच छत्री उघडून घरी निघाले तर काय माझ्या भोवताल रंगीबेरंगी धारा सांडू लागल्या..पांढरा शुभ्र शाळेचा फ्राॅक प्रत्येक रंगाने रंगला..तशीच माझी रंगलेली स्वारी घरी आली…

जरा मोठी झाले ,ऐटीत शाळा काॅलेजला जातांनाही लेडीज छत्री एका हातात सांभाळत,व एका हाताने हॅंडल सांभाळत ,अर्धे भिजत पाण्याचे खड्डे सांभाळत सर्कस व्हायची.

पुढे किशोरवय,व फुलपंखी वयात सिनेमा बघतांना छत्रीची वेगळीच मजा

वाटायची‌‌.‌..दोघे जण गप्पा करत आणि लगेच एक हातातील छत्री ते दोघांच्या चेहर्यावर आणत, ते उघडं गुपीत काळजावर कोरलं जाई…पाऊस आला की छत्रीची देवाण घेवाण ,एका छत्रीत भिजतच का होईना पण खुशीनं जाणं,आणि मग पुढे सिनेमा असायचाच…तेव्हा छत्रीचं स्वरुप रोमॅंटिक वाटे फार….!

स्वप्नातून सत्यात आलो आणि खाड्कन डोळे उघडले‌.‌बाजारात गेलं की

सामान आणतांना पावसात छत्री उघडणं कर्मकठीण…तोपर्यंत अर्ध अधिक भिजूनच जायचं..तेव्हा कुठे झटापट करत छत्रीमाय डोक्यावर येई.कधी घाईत छत्री उघडता मिटता,जोरात चिमटे बसत‌‌…काही छत्र्या ज्याच्या त्यालाच साथ देतात,म्हणजे किती दाब दिला की छत्री उघडेल,जोरात उघडली की ती रागावून उलटी होत असे.मग मात्र तिला सरळ करणं कठीण होई….कितीदा,हवी तेव्हा उघडत नाही किंवा मधले तारहशिवलेले धागे तुटतात..ती फजिती टाळायला, छत्री आणली की मी टाके पक्के करून टाकायची.

पाऊस आला की कोणाला आपली छत्री देणं भाग पडतं.पण पाऊस संपला की ते परत करत नाहीत‌.यात सगळे घरातील कामं करणारेही आलेत…महिनाभर छत्री मागून आपण थकतो पण हो आणते हेच उत्तर मिळतं.दर पावसाळ्यात चार नवीन छत्र्यांची खरेदी करणे आलेच मग…

कार्यक्रमाला नेलेली,प्रवासात भिजलेली,एका बाजूला पाणी निथळायला ठेवलेली आपली छत्री कधीच जागेवर सापडत नाही.ती गायबच झालेली असते.

तरी काही छत्र्या मात्र कमालीची साथ देतात.लळाच लागतो त्यांचा.

फाॅरेनला तर छोटीशी फोल्डिंग छत्री सतत सोबत सांभाळावीच लागते.कधी शिरवा ,वारा येईल नेमच नसतो.

मोठ्या छत्र्यांच्या आडोशाने खेळणीवाले,मोची,चिल्लर भाजीवाले,टळटळीत उन्हात दिवसभर काम करतात,तेव्हा ती छत्री, मायेचं छत्र वाटतं.‌.

सुती जाड काळं कापड जाऊन अनेक रंगात व मटेरियलमधे नंतर आकर्षक छत्र्या येऊ लागल्या. काहींवर सुंदर सुंदर वाक्य ,तर फोटो,लक्ष वेधून घेणारे…त्यावरून प्रत्येकाची हौस,आवड ,रसिकता,निसर्गाची आवड लक्षात येते.व वाचून आपणही नकळत दाद देतो…मनातच किती छान म्हणून टाकतो…!अशी ही रंगरूप बदलत रहाणारी पण निरंतर सोबत असणारी सखी .‌‌..‌

पाऊस ,ऊन सगळ्या ठिकाणी आपली सदैव साथ देणारी ही मैत्रीण गरज संपली की तिला गुंडाळून बटन लावलं की पुन्हा कपाटात निमूट जाऊन बसते….

पुन्हा पाऊस येईपर्यंत…..!

 

💦🌂🌂💧💧☔☂️💦

अरुणा दुद्दलवार

दिग्रस यवतमाळ✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा