You are currently viewing सहयोग ग्रामविकास मंडळ गरड माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा थाटात संपन्न

सहयोग ग्रामविकास मंडळ गरड माजगाव व श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा थाटात संपन्न

*कु.उत्कर्षा मठकर प्रथम, कु.चिन्मयी कुलकर्णी द्वितीय तर कु.वैष्णवी कदम तृतीय क्रमांकाच्या मानकरी*

 

*मालवणी कवी दादा मडकईकरांच्या मालवणी काव्य गायनाने वाढविली कार्यक्रमाची रंगत*

 

सावंतवाडी: सावंतवाडी माजगाव येथील सहयोग ग्रामविकास मंडळ गरड आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय (वरिष्ठ महाविद्यालय) स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत सावंतवाडी येथील एस पी के महाविद्यालयाची कु.उत्कर्षा मठकर प्रथम, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाची कु.चिन्मयी कुलकर्णी द्वितीय, आणि हळबे कॉलेज दोडामार्गची कु.वैष्णवी कदम तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या तर स. ह. केळकर महाविद्यालय देवगडची कु. गुणाली घाडी आणि वेंगुर्ला बॅ. खर्डेकर कॉलेजची कु.विधी नाईक यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सभागृहात १८ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सदर स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या कार्याध्यक्षा श्रीमंत शुभदादेवी भोसले होत्या. तर व्यासपीठावर मालवणी कवी दादा मडकईकर, प्राचार्य डॉ.भारमल, स्पर्धेचे परीक्षक कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर, गोव्याचे साहित्यिक प्राचार्य गजानन मांद्रेकर, प्रा. दिलीप गोडकर, प्रा. एम.व्ही. कुलकर्णी, साहित्यिक विनय सौदागर, प्रा.नंदीहळी, कोमसाप जिल्हा सचिव संतोष सावंत, बाळकृष्ण राणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर काव्यवाचन स्पर्धेचे उद्घाटन श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत शुभदादेवी भोसले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी सहयोग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. गोडकर यांनी प्रास्ताविक करताना मंडळातर्फे राबविले जाणारे वार्षिक उपक्रम आणि मंडळाचा उद्देश याबाबत सविस्तर माहिती दिली आणि युवा साहित्यिकांना लिहिण्याची प्रेरणा व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सदरची स्पर्धा श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या सहयोगाने आयोजित केल्याचे स्पष्ट केले. श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या कार्याध्यक्षा श्रीमंत शुभदादेवी भोसले यांनी आपल्या या स्पर्धेसाठी उपस्थित राहता आल्याबाबत समाधान व्यक्त करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे परीक्षक गोवा येथील महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन मांद्रेकर यांनी स्पर्धेविषयी माहिती देऊन कविता म्हणजे काय..? याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भारमल यांनी देखील आपल्या मनोगतात सहयोग ग्रामविकास मंडळच्या उपक्रमाचे कौतुक केले. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयाचा एक स्पर्धक याप्रमाणे १३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी नवकवींनी विविध विषयांवर काव्यरचना सादर करून उपस्थितांकडून दाद घेतली.

 

*या कवींनी स्पर्धेत भरला रंग*

कु.योगिनी तिर्लोटकर (एस पी के लॉ कॉलेज), कु. चिन्मयी कुलकर्णी (भाईसाहेब सावंत आयु.कॉलेज), कु.उत्कर्षा मठकर(एस पी के), कु.विधी नाईक(बॅरि.खर्डेकर कॉलेज), कु.वैष्णवी चौकेकर (जे .बी.नाईक), नितीन रावले(पणदूर तिठा), यतीन फाटक(पानवळ कॉलेज, बांदा), कु.राधिका पालव(कणकवली कॉलेज), कु.वैष्णवी कदम(हळबे कॉलेज, दोडामार्ग), कु.गुणाली घाडी(स. ह. केळकर देवगड), सौ नम्रता शेटये(फोंडा कॉलेज), महादेव धुरी(यशवंतराव भोसले कॉलेज).

 

*दादा मडकईकरांच्या मालवणी काव्य गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले*

स्पर्धेच्या दरम्यान निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असताना मालवणी कवी दादा मडकईकर यांच्या मालवणी काव्य गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. “लय दिसांनी जावय इलो जाये कोंबडो मार गे” या गाण्याने राणी सरकार देखील भारावून गेल्या. दादांच्या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी कार्यक्रमात वेगळाच रंग भरला. त्यांना तबला वादक म्हणून किशोर सावंत तर हार्मोनियम वर निलेश मेस्त्री यांनी उत्तम साथ दिली.

स्पर्धेचा निकाल देण्यापूर्वी परीक्षक म्हणून मनोगत मांडताना कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी “कवीच्या भावना आणि विचारांचा सुरेल संगम म्हणजे कविता” अशी काव्याची व्याख्या सांगितली व नवकवींना मार्गदर्शन करताना नवकवींनी दीर्घ कविता न लिहिता आपल्या रचनेतून कमी शब्दात मोठा आशय सांगण्याचा प्रयत्न करावा अशी सूचना करून, इतर मोठमोठ्या कवींच्या कविता वाचा, तुमच्या जवळ शब्द सामर्थ्य वाढवा आणि आपल्या काव्यातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा असा सल्ला दिला. आभार प्रा.नंदीहळी यांनी मानले तर संपूर्ण काव्य स्पर्धेच्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार मालवणी साहित्यिक विनय सौदागर यांनी केले. सर्व विजेत्यांच्या कवितांना आरती मासिक मध्ये प्रसिद्धी दिली जाईल असे आरती मासिकचे कोषाध्यक्ष श्री भरत गावडे यांनी जाहीर केले. ही काव्यवाचन स्पर्धा सावंतवाडी येथील मे.भारतमाता स्टेशनरीचे मालक श्री.मंदार केरकर यांनी प्रायोजित केली होती.

प्रा.व्ही. व्हि.जोशी, हेमंत झांट्ये, सौ ममता झांट्ये, सौ. सुप्रिया गोडकर, प्रा.डी. के. मलिक, प्रा. एस.एस. पाटील, प्रा.एन डी.धुरी, शाम भाट, दत्तप्रसाद गोठोस्कर, प्रदीप प्रियोळकर, एम. एल.देसाई, विजय देसाई, गुरु राऊळ, कामले सर, विनय केरकर, प्रा.महेंद्र ठाकूर, सौ.अक्षता सातार्डेकर, डॉ.दीपक तुपकर, कोमसापचे जिल्हा सदस्य भरत गावडे आदी अनेक मान्यवर साहित्य प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा