शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू परब वाढदिवस अभिष्टचिंतन…
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजू परब यांचा १९ ऑगस्ट हा जन्मदिवस. सावंतवाडी तालुक्यातील तरुण तडफदार नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केलेले, खासदार नारायण राणे आणि निलेश राणे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होऊन राजकारणात यशस्वी वाटचाल करणारे आणि आमदार निलेश राणे यांच्या मर्जीतले म्हणून ज्यांची विशेष ओळख आहे ते म्हणजे संजू उर्फ सच्चिदानंद परब. गेली काही वर्षे विजय आणि संजू हे जणू समीकरण तयार झाले आहे. याला आता आणखी एक यशस्वी जोड मिळाली ती म्हणजे गेली अनेकवर्षे यशस्वी राजकारणी म्हणून ओळख असणारे माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांची.. त्यामुळे भविष्यात विजयाचे पारडे संजू परब यांच्याच बाजूने झुकलेले असेल हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाहीच.
काही वर्षांपूर्वी आमदार दीपक केसरकर विरोधात असताना सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत आठ नगरसेवक निवडून आणून संजू यांनी आपल्या नेतृत्वाची झलक दाखवून दिली होती आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सर्वच आघाडींवर श्रेष्ठ ठरत त्यांनी विजय अक्षरशः खेचून आणला होता. त्यांच्या विजयामुळे सावंतवाडी नगरपालिकेवर प्रथमच नारायण राणे, नितेश राणे यांनी सत्ता आली आणि गेली कित्येक वर्षे सावंतवाडीवर सत्ता मिळविण्याचे नारायण राणे यांचे स्वप्न साकार झाले होते. परंतु बदलत्या राजकारणात आमदार निलेश राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केल्याने आपल्या नेत्यावर निष्ठा असलेले संजू परब देखील शिवसेनावासी झाले. त्यामुळे एकेकाळी विरोधात असलेले आमदार केसरकर आता त्यांच्या सोबत आहेत आणि आमदार निलेश राणे यांची भक्कम साथ आहे, त्यामुळे सावंतवाडी पालिकेवर पुन्हा एकदा संजू परब यांच्या नेतृत्वात भगवा डौलाने फडकणार हे निश्चित मानले जात आहे.
संजू परब हे सर्वसामान्य कुटुंबातून उदयास आलेले नेतृत्व आहे. कुटुंबातील सर्वच व्यक्ती उच्चशिक्षित असल्याने एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबाचा वारसा त्यांना लाभलेला आहे. गोरगरिबांचा कळवळा असलेले संजू परब संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीला धावून जातात. त्यामुळेच अनेक लोक मोठ्या आशेने त्यांच्याकडे मदतीसाठी येतात. सरकारी दफ्तरातील कामे असो वा इतर शासकीय कामे स्वतः मैदानात उतरून ते ती मार्गी लावतात. अधिकारी वर्गावर त्यांचा वचक आहे. त्यामुळेच संजू परब यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. संजू परब यांच्या दिलदार वृत्तीमुळे सावंतवाडी मतदारसंघातील उभरते नेतृत्व म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिले जाते.
सावंतवाडीच्या या दिलदार नेतृत्वाचा आज वाढदिवस…. *संवाद मिडियाकडून संजू परब यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि भावी वाटचालीसाठी सदिच्छा…*
