विजयदुर्ग किल्ल्यावर उद्या हेलियम दिवस साजरा होणार
विजयदुर्ग
विजयदुर्ग किल्ल्यावर आज सोमवारी भव्य हेलियम दिवस आयोजित केला असून प्रतिवर्षी १८ ऑगस्ट रोजी हा दिवस विजयदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जातो. २००७ सालापासून हेलियम डे साजरा केला जात आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर १८ ऑगस्ट १८६८ साली जोसेफ नॉर्मन लॉकियर या शास्त्रज्ञाने हेलियमचा शोध लावला. ज्या ठिकाणी नॉर्मन लॉकियरने विजयदुर्ग किल्ल्यावर दुर्बिन लावून अवकाशातील हेलियम वायुचा शोध लावला ती जागा आजही ‘सायबाचे ओटे’ म्हणून ओळखले जाते. या सायबाच्या ओट्यावर माजी आमदार प्रमोद जठार आणि खगोलप्रेमी स्व. चंद्रकांत परुळेकर यांनी २००७ सालापासून हेलियम दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. कालांतराने या उपक्रमाला शासकीय मान्यता मिळाली असून आता विजयदुर्ग ग्रामपंचायत आणि सुनिता शांताराम ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा केला जातो. दरम्यान, आज होणाऱ्या या कार्यक्रमाला खगोलप्रेमी आणि इतिहासप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन विजयदुर्गचे प्रभारी सरपंच रियाज काझी आणि सुनील शांताराम ट्रस्टचे प्रमोद जठार यांनी केले आहे.


