You are currently viewing गणेश नाईक यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

गणेश नाईक यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

*गणेश नाईक यांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन*

*▪️वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या दोन पुस्तकांचे प्रकाशन*

वेंगुर्ले

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर आणि वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते गणेश नाईक यांच्या वेंगुर्ल्यातील गडकिल्ले व शिव दिनविशेष या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री स्वयंभू मंगल कार्यालय मठ येथे करण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेश नाईक यांनी लिहिलेल्या वेंगुर्ल्यातील गडकिल्ले या पुस्तकात यशवंतगड, निवती किल्ला, वेंगुर्लेकोट म्हणजेच डच वखार या परिचित गडकिल्ल्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होडावडे कोट ज्याला होडावडे चावडी म्हणूनही ओळखले जाते. तो काळाच्या पडद्याआड गेलेला किल्ला पुन्हा उजेडात आला आहे. या कोटाला उजेडात आणायला होडावडे येथील चंद्रकांत दळवी, राजा दळवी, श्रीधर दळवी यांचे सहकार्य अत्यंत मोलाचे ठरले. दळवी समाज व दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या संयुक्त प्रयत्नांतून ह्याचे संवर्धन कार्यही चालू आहे. त्याचप्रमाणे, सध्या अस्तित्वात नसलेल्या कर्ली किल्ल्याबाबतही माहिती या पुस्तकात समाविष्ट केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी जीवन अनेकांना प्रेरणा देणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे पराक्रम, ध्येय, न्याय आणि राष्ट्रप्रेम यांचे प्रतीक आहे. त्यांचा प्रत्येक दिवस हा इतिहास घडवणारा ठरला. हाच इतिहास शिव दिनविशेष या पुस्तकाच्या रूपाने, ‘त्या-त्या’ दिवशी घडलेल्या घटनांच्या आधारे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या पुस्तकामधून मी महाराजांचे असामान्य आणि दिव्य जीवन अधिक सुलभ व आधुनिक पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या आजच्या डिजिटल युगात नव्या पिढीला इतिहासाशी जोडण्यासाठी केवळ शब्द पुरेसे ठरत नाहीत. म्हणून या पुस्तकात प्रत्येक दिनविशेषासोबत QR कोडचा वापर केला आहे, ज्यामार्फत वाचक त्या घटनेचा सखोल अभ्यास छायाचित्रे, व्हिडिओ, संदर्भ लिंकद्वारे करू शकतील.
कै. रायासाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे औचित्य साधून या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर आणि वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी, तुळस बीट शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र कोनकर, ग्रामपंचायत मठ सरपंच रुपाली नाईक, शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, सहाय्यक शिक्षक प्रतिमा साटेलकर, पांडुरंग चिंदरकर, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा