मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे भाजपकडून निवेदन
बांदा :
गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या बांदा शहर व परिसरातील युवक-युवती, विद्यार्थी, नोकरीसाठी जाणारे तसेच उपचारासाठी जाणारे नागरिक यांना सकाळच्या वेळेत प्रवासाची मोठी गैरसोय भासत आहे. सकाळी ७ वाजेपर्यंत गोव्याला जाण्यासाठी कोणतीही बस सेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना वेळेत शाळा-कॉलेजमध्ये पोहोचणे अवघड होते. विशेषतः परीक्षा काळात ही समस्या अधिक तीव्र भासते.
पत्रादेवी ते मडगाव जाणारी बस सकाळी ६.२० वाजता महामार्गावरून सुटते. हीच बस बांदेश्वर मंदिरातून सुटली, तर बांदा व परिसरातील सर्व नागरिकांची सोय होईल. तसेच सावंतवाडी–पणजी व सावंतवाडी–मडगाव या मार्गावरील बसेस महामार्गावरून न नेता बांदा शहरातून सोडाव्यात, अशी ठोस मागणी भारतीय जनता पार्टी बांदा शहराच्या वतीने करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनी पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, माजी सभापती शीतल राऊळ, शहराध्यक्ष बाबा काणेकर, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर आगलावे, संतोष सावंत, माजी सदस्य राजेश विरनोडकर, हुसेन मकानदार, सुनील राऊळ, मंदार महाजन, गुरु कल्याणकर, निलेश कदम आदी उपस्थित होते.

