सावंतवाडी : तालुक्यातील चौकुळ ग्रामपंचायतीने एक अभिनव उपक्रम राबवत एक नवा आदर्श घालून दिला आहे. ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाचा बहुमान जिल्हा परिषदेच्या ‘आदर्श अंगणवाडी सेविका’ पुरस्कार प्राप्त वंदना गावडे आणि ‘आदर्श अंगणवाडी मदतनिस’ पुरस्कार विजेत्या जनाबाई गावडे यांना देण्यात आला.
चौकुळमधील-गोनसाठवाडी अंगणवाडीत कार्यरत असलेल्या या दोघींनी केलेल्या कामाची दखल घेऊन ग्रामपंचायतीने त्यांना हा विशेष सन्मान प्रदान केला. आपल्या कार्यामुळे समाजात एक चांगला संदेश जावा, या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतला.
यावेळी चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे, उपसरपंच आरती जाधव, ग्रामपंचायत अधिकारी अमित राऊळ, केंद्रप्रमुख शंभावना गावडे तसेच माजी सैनिक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

