You are currently viewing स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट)

स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट)

*लालित्य नक्षत्रवेल समूह प्रशासिका लेखिका कवयित्री पल्लवी उमरे (शब्दवैभवी) लिखित अप्रतिम लेख*

 

*उत्सव स्वातंत्र्याचा*

*स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट)*

 

जयोस्तुते , जयोस्तुते,श्री महन्मंगले शिवास्पदे‌शुभदे.. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे…या सावरकरांच्या गीताच्या ओळी ऐकल्या की अंगात काय वीरश्री संचारतेय…स्फुरणं चढतं अंगात ,आणि कमालीची देशभक्ती जागृत होते, व्हायलाच पाहिजे..!! डोळ्यासमोर स्वातंत्र्य देवतेची प्रतिमा तरळून जाते..दास्यत्वाच्या शृंखलेत अडकलेले मातृभूमीचे सर्वांग बेड्यांनी जखडलेले.. बघितले की असंख्य विंचवानी दंश करावा तशा ह्रदयाला वेदना होतात आणि छिन्नविछीन्न होत जातं मन शिरतं नकळत भूतकाळात…!!!

 

ज्या ज्या देशभक्तांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती ‌दिली,आठवतो त्यांचा पराक्रम सळसळते रक्त ,क्षणार्धात कळत नकळत भूतकाळातल्या स्मृतींचा चलचित्रपट डोळ्यासमोर येतो आणि पलटू लागतात त्या सुवर्णमयी इतिहासाची पाने. आठवते ती झाशीची राणी लक्ष्मीबाई मेरी झांशी नहीं दूंगी म्हणत इंग्रजांवर तुटून पडणारी ,आठवतात ते भगतसिंग राजगुरू सुखदेव स्वातंत्र्यासाठी हसतहसत सामोरे जाणारे, अनेक क्रांतिकारी जे बंड करुन उठलेत इंग्रजांविरुद्ध, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस,आठवतात ते हिंदवी स्वराज्याचा ध्यास घेतलेले शिवराय…हजारो क्रांतीज्योती ज्यांनी अखंड प्रज्वलित ठेवल्या त्या सर्व हुतात्म्यांची शहादत…!!उगाच नाही मिळाले स्वातंत्र्य आपल्याला ,या सर्व थोर आत्म्यांना त्यांच्या प्राणाची आहुती द्यावी लागली…१८५७ चा उठाव…

इंग्रजांविरुद्ध ज्यांनी बंड पुकारले युद्ध पुकारले… झाशीचा उठाव, गांधीजींचा सत्याग्रह, देशांतर्गत चळवळी, जालियनवाला बाग हत्याकांड…त्यानंतर गांधीजींनी इंग्रजांना दिलेला चले जावे चा बुलंद नारा… !

इंग्रजांना सळो की पळो करून सोडत, शेवटी भारत सोडून जाण्यास भाग पाडले. अंधारकोठडीत रात्रंदिवस यातना भोगून लाखो क्रांतीकरकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले.

भगतसिंग राजगुरू, सुखदेव यांनी हसत हसत फाशीची शिक्षा भोगली.

अशा कितीतरी रक्तरंजित घटना साक्षी आहेत , स्वातंत्र्यलढ्याची साक्ष देणाऱ्या…!!!

 

इन्कलाब जिंदाबाद चा नारा देत जल्लोष करणारी ती सुवर्णमयी पहाट,तो त्या पहाटेचा तेजःपुर्ण सुर्य..दास्यत्वाच्या श्रृंखलातून मातृभूला मुक्ती मिळाली‌ तो क्षण… ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणत तळमळणारे सावरकर… विजयी विश्व तिरंगा प्यारा,झेंडा उंचा रहे हमारा या गीतांने प्रभातफेरीचे वस्त्यांमध्ये गुंजणारे स्वर…!

 

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० ला भारतीय गणराज्याची स्थापना झाली…हा सुवर्णकाळ ह्या सोहळ्याचे आपण साक्षीदार,मोठ्या डौलाने तिरंगा दोन्ही दिवस लाल किल्ल्यावर फडकतो…आपण हा सोहळा शाळा,काॅलेज सरकारी आॅफिसमधून धुमधडाक्यात साजरा करतो..ही देशभक्ती एका दिवसापुरती असावी का? वर्षभर सर्व स्वातंत्र्याचा दुरुपयोग करायला मोकळे…असे होता कामा नये, प्रत्येकाने जबाबदारीने वागून या देशाच्या उत्कर्षासाठी झटले पाहिजे. काही विघातक शक्ती, जातीधर्माच्या नावाखाली देशांतर्गत हल्ले करून,दंगे घडवत आहेत.

 

देशात अराजकता न माजवता,घटनेचा आदर करायला हवा.. प्रत्येक जातीधर्माचा आदर करायला हवा राष्ट्रीय संपत्तीचे जतन करायला हवे..नवनवे तंत्रज्ञान,विज्ञान उद्योगधंदे ,शेतिव्यवसायाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करायला हवे… नैसर्गिक संपदेचे जतन,प्रणिमात्राचे जतन, संवर्धन ही आपली नैतिक जबाबदारी आहे…दहशतवादाला खतपाणी न घालताभारतीय सैन्याचे हात बळकट करायला हवेत.संविधानाने दिलेल्या अधिकारांचा योग्य वापर करून आपले स्वातंत्र्य टिकवायला हवे,तरच धर्मनिरपेक्ष स्वतंत्र भारत देश नावारूपाला येईल…!! स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतेवेळी ते अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत…तरच सुजलाम सुफलाम भारताचे स्वप्न साकार होईल…!!

 

जहाँ डाल डालपर सोनेकी, चिडिया करती है बसेरा,..वो भारत देश है मेरा…!! या वर्षी आपण भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करतोय, घर घर तिरंगा हे घोषवाक्य सरकार अमलात आणतेय,तिरंग्याचा अभिमान बाळगणे आपले कर्तव्यच आहे.असंख्य प्राणांची आहुती देऊन मिळवलेले स्वातंत्र्य कायम अबाधित राखण्यासाठी खऱ्या अर्थाने भारताचे सुजाण नागरीक बनून देशाचे हात बळकट करीत प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी पार पाडून देशाला सुजलाम सुफलाम बनवूया जयहिंद, जयभारत

स्वातंत्र्यदिन चिरायू होवो , स्वातंत्र्यदिनाच्या

सर्व भारतीय बांधवांना खूप खूप शुभेच्छा

 

©® शब्दवैभवी पल्लवी उमरे

प्रतिक्रिया व्यक्त करा