You are currently viewing पुष्पसेन सावंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अवयवदानासाठी जागर संकल्प

पुष्पसेन सावंत कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा अवयवदानासाठी जागर संकल्प

सिंधुदुर्गनगरी :

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या वतीने श्री. पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी येथे जागतिक अवयवदान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले व अवयवदान करण्याची शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश ढेले आणि समाजसेवा अधीक्षक सुनील कुंडगीर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अवयवदानाच्या सामाजिक व वैद्यकीय महत्त्वाविषयी सविस्तर माहिती दिली. गरजू रुग्णांना अवयवदानातून नवजीवन कसे मिळते हे समजावून सांगितले तसेच गरजू रुग्णांना मदत करण्याच्या प्रक्रिया व मार्गदर्शनही केले.

या प्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील रक्तपेढी व रक्त विघटन विभागातील नितीन तूरनर यांनी रक्तदानाचे महत्त्व स्पष्ट केले. नियमित रक्तदान केल्याने आरोग्याला होणारे फायदे सांगत विद्यार्थ्यांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी अवयवदान करण्याची शपथ घेतली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवयवदान व रक्तदान या दोन्ही महत्त्वाच्या सामाजिक कार्यांविषयी जागरूकता वाढली. कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा