*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ. मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बंद दार मनातले*
मनात काही जागा असतात
जिथं न प्रकाश पोहोचतो,
न शब्द थांबतात,
आणि माणसं तर दूरच असतात.
तिथं असतं एक दार —
जड, आठवणींनी भरलेलं.
कोणी विचारलं,
तर आपण हसून टाळतो,
कारण ते उघडणं म्हणजे
जखमा पुन्हा उघडणं.
काही आठवणी बोचतात,
काही गुदमरवतात,
काहींची चाहूलसुद्धा
भीतीदायक वाटते.
त्या दारामागे
आपल्याच तुटक्या तुकड्यांचा ढिग असतो,
ओळखीचा, पण दुर्लक्षित.
आपण झाकून ठेवतो,
कारण पाहायचं धैर्य होत नाही.
पण एक दिवस —
कोणीतरी, एखाद्या शांत स्पर्शानं,
किंवा स्वतःच्या थांबलेल्या पावलांनी
ते दार हलकं उघडतो.
तेव्हाच समजतं —
त्या अंधाऱ्या खोलीत आपणच तर होतो,
वाट पाहत…
की कोणी यावं आणि
आपल्यालाच स्वतःशी भेट घडवून द्यावी.
©️®️ डॉ सौ.मानसी पाटील
मुंबई
