You are currently viewing आर्थिक व्यवहार: पारदर्शकता

आर्थिक व्यवहार: पारदर्शकता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*आर्थिक व्यवहार: पारदर्शकता..*

 

या शीर्षकातच आर्थिक व्यवहाराचे यश आहे.

किंबहुना जे आर्थिक व्यवहार पारदर्शी असतात

ते कधीच बुडत नाहीत.जिथे संशयाची सुई फिरली तो व्यवसाय बुडालाच म्हणून समजा.

विश्वास ही अशी एक गोष्ट आहे की, त्यावरच

जग चालले आहे.कोटी कोटींचे वायदे सुद्धा विश्वासावर होतात कारण तिथे १००/- पारदर्शकता असते, विश्वास असतो म्हणून केवळ शब्दांवर व्यवहार होतात. अर्थात त्या साठी दोन्ही पार्ट्या स्वच्छ असाव्या लागतात.

 

मोठ मोठ्या अत्यंत नावाजलेल्या कंपन्या आहेत

त्यांचे व्यवहार पारदर्शक आहेत म्हणूनच त्या

नफ्यात आहेत, टिकून आहेत, विश्वासू आहेत व

राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहेत.

उदा. मा. जमशेटजी टाटांनी स्थापन केलेली “टाटा” कंपनी. ही साधी कंपनी नाही, हा भला मोठा ट्रस्ट आहे. तो स्थापन झाल्यापासून स्टील

मध्ये भारत सतत एक नंबर राहिला. स्टील पासून

रोजच्या खाण्याच्या मिठा पर्यंत त्यांनी जनमानसात विश्वास निर्माण केला ही साधी गोष्ट नाही. टीका करणारे नाकर्ते लोक अनेक

प्रकारे टीका करतात, त्यांनी टीका करण्या ऐवजी एखादी छोटी कंपनी काढून चालवून दाखवावी मग बोलावे.

 

जेव्हा जेव्हा देशाला गरज पडली तेव्हा टाटा

धावून जाणारे पहिले सद् गृहस्थ ठरले आहेत.

सुरुवाती पासून ते आजतागायत. शिवाय

देशहिताचे व समाज हिताचे इतके प्रकल्प ते

चालवतात की त्यांची साधी माहितीही आपल्याला नाही. अनेक स्तरांवर त्यांचे समाजकार्य चालू असते.

 

मुळात “ हॅाटेल ताज” ची निर्मितीही अशाच एका

स्वाभिमान दुखावणाऱ्या प्रसंगातून झाली आहे.

परदेशात एका हॅाटेलमध्ये अपमान झाल्यावर

अपमान करणाऱ्यांना माझ्याच हॅाटेलमध्ये उतरावे लागेल व आश्चर्यचकित व्हावे लागेल अशा हॅाटेलची मी निर्मिती करेन अशी प्रतिज्ञा

करून हे हॅाटेल उभे राहिले ज्याचा पायाच त्या

काळी चाळीसफूट खोल खणला गेला.आज टाटा

ग्रूपचे अनेक व्यवसाय राष्ट्रहित व पारदर्शकता या पायावर उभे रहात देशाचे नाव उंचावत आहेत.

 

टाटा बिर्ला किर्लोस्कर गरवारे इंम्फेसिस अशा अनेक कंपन्या जगभर नाव राखून आहेत त्या उगीच नाही. एकेकाळी देशात किर्लोस्कर ॲाईल इंजिनला

पर्याय नव्हता एवढा त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास

संपादन केला होता. विश्वास व पारदर्शकता असेल तरच तुम्ही शतकानुशतके टिकून राहू

शकता अन्यथा लगेच तुमचे दिवाळे वाजले म्हणून समजा.एक गमतीची गोष्ट आठवली ती

सांगते…..

 

(आमचे एक महाराज परदेशात मर्सिडिज कार खरेदीला परदेशात

गेले असता त्या परकियांनी त्यांची पारंपारिक राजघराण्याची वेशभूषा पाहून त्यांची टवाळी करत त्यांचा अपमान करून, हा काय मर्सिडिज

खरेदी करणार म्हणताच,राजांना ते जिव्हारी लागून त्यांनी तिथे असतील तेवढ्या सर्व मर्सिडिज खरेदी केल्या व मुंबईच्या रस्त्यावरून

त्या मर्सिडिज कचरा गाड्या म्हणून धावू लागल्या. मग काय? परकियांचे धाबे दणाणले नि ते सुतासारखे सरळ होऊन शरण आले.)तेव्हा

कुठे त्या कचरागाड्या बंद झाल्या. परकियांनी

विश्वास गमावला व फजिती करून पायावर धोंडा पाडून घेतला.ही मंडळी अट्टल देशाभिमानी

आहेत हे आपण विसरू नये. अशाच आणखी एका कंपनीलाच टाटांनी विकत घेतल्याचे आपल्याला माहित आहे.इंफोसिसची पारदर्शकता व अफाट समाजकार्य आपल्याला

परिचित असेलच. सुधा मुर्ती या पहिल्या कंम्प्युटर इंजिनियर आहेत, पूर्ण पाय जमिनीवर

असलेल्या व देशाभिमानी!

 

कोणतीही अगदी छोटी असो मोठी असो, त्या कंपनीचे व्यवहार पारदर्शी असतील तरच ती

जनमानसाचा विश्वास कमावू शकते. नाहीतर

लवकरच तिचे दिवाळे वाजते. काही लोक दरवर्षी नवी कंपनी काढतात व भागिदाराला

बुडवतात. आमच्या आसपासच आम्ही असे अनुभव घेतले. भागीदारीत कंपनी कितपत

व्यवस्थित चालते या विषयी तर मला शंकाच

आहे. सतत एकमेकांकडे अविश्वासाने बघायचे.

आम्ही विश्वासाने एकत्र घर बांधायला काढले

तर आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला” त्राही माम”

करून सोडले. तेव्हापासून कानाला खडा लावला.

लबाडी करणे म्हणजे मी फार हुशार आहे, असे समिकरणंच झाले आहे आता. वरून मीच कसा

बरोबर! ना खेद ना खंत! दुनिया अशीच आहे हो

आज, काय करणार.. स्वाभिमान हा धर्म सांभाळत लोकहित व राष्ट्रवाद जोपासते ती

कंपनी खरी.काही लोक भागीदारीत हॅाटेल काढतात व एका महिन्यात हात वर करून भागिदाराला बुडवतात. आमच्या शेजारी असे घडले आहे. नंतर तो, जो बुडाला तो मुंबईला पळून गेला.परत आला पण बस्तान बसलेच नाही. व्यवहारात पारदर्शकता नसेल तर एक

भिडू असा आयुष्यातून उठतो तो कायमचा.

आता तर तो कायमचाच वर गेला आहे.

 

पारदर्शकता व विश्वास गमावला की काय

घडते याचे अनेक किस्से आजूबाजूला घडतांना

आपल्याला दिसतात.म्हणून आम्ही तर घरातही सर्व व्यवहार पारदर्शी व स्वतंत्र ठेवतो, प्रत्येकाला

आपल्या पैश्यांचे, व्यवहाराचे स्वातंत्र्य हवेच

नाही का? त्यामुळे आपल्या मतानुसार पैसा खर्च

करता येतो व स्वत:चे नियंत्रणही त्यावर राहतेच,

राहते. पैश्यांचे नियोजन व व्यवस्थापन नीट केले

नाही तर कोट्यधिश नट, नट्या, क्रिकेटर व्यावसायिक रस्त्यावर आलेले आपल्याला बघायला मिळतात. अक्षरश: भिकेला लागलेले

आपण बघितले आहेत. कितीही कमाई केली पण व्यवस्थापन नीट केलेच पाहिजे. नाहीतर

पश्चातापाची वेळ येतेच येते, तेव्हा हातातून साऱ्या गोष्टी निघून गेलेल्या असतात.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा