मुंबई-गोवा महामार्गावर कारला अपघात, आई-मुलगा जखमी…
कुडाळ
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील सांगिर्डेवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात आई आणि तिचा मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. गोवा येथून पुणे येथे जात असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. चालक प्रसन्न बागकर आणि त्यांची आई आरती बागकर गोव्याहून पुण्याला आपल्या कारने परत येत होते. कुडाळमधील सांगिर्डेवाडी येथे आल्यावर प्रसन्न यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्यांची कार दुभाजकावरील मैलाच्या खांबाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि टायरही फुटले. सुदैवाने गाडीतील दोन्ही एअरबॅग उघडल्यामुळे आई आणि मुलाला किरकोळ दुखापत झाली.
अपघातानंतर भाजपचे शहराध्यक्ष सुनील बांदेकर आणि नगरसेवक निलेश परब यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. महामार्ग वाहतूक नियंत्रण पोलीस आणि कुडाळ पोलिस ठाण्याचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

