दोडामार्ग तालुक्यास भुमि अभिलेख कार्यालयासाठी स्वतंत्र इमारतीच्या निधीची मागणी
दोडामार्ग
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दोडामार्ग तालुक्यासाठी स्वतंत्र भुमि अभिलेख कार्यालयाच्या इमारतीसाठी निधीसह मंजुरीची मागणी केली आहे.
त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, पूर्वी सावंतवाडी आणि दोडामार्ग एकत्रित तालुका होता. मात्र, शासनाने क्षेत्रफळ व भौगोलिक अडचणी लक्षात घेऊन स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्माण केला. यानंतर महसूल विभागाची बहुतांश कार्यालये सुरू झाली आहेत, परंतु भुमि अभिलेख कार्यालय अद्याप स्थापन झालेले नाही.
सध्या हे काम तहसिल कार्यालयातून सुरू असून ते कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत आवश्यक आहे. स्थानिक जनतेच्या मागणीनुसार हे कार्यालय इमारतीसह मंजूर करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली आहे.
