शासनासोबत व्यवस्थापन समितीने योग्य समन्वय ठेवावा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाअंतर्गंत येत असलेली महाविद्यालये, प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ व्यवस्थापन समितीने उच्च व तंत्रशिक्षण विभागासोबत योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित कार्यक्रमापूर्वी व्यवस्थापन समिती सदस्यांसोबत विविध समस्यांबाबत बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार सर्वश्री नागो गाणार, दुष्यंत चतुर्वेदी, अभिजित वंजारी, समीर मेघे, कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी, प्र-कुलगुरु संजय दुधे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, उच्च तंत्रशिक्षणचे संचालक डॉ. धनराज माने, उच्च शिक्षणचे संचालक डॉ. अभय वाघ, विभागीय सहसंचालक डॉ. महेशकुमार साळुंखे, डॉ. प्राचार्य मिलिंद बारहाते, डॉ. सुचिता दलाल, डॉ. कविश्वर, डॉ. निर्मलकुमार सिंग, डॉ. नितीन कोंगडे, दिनेश शेराम, आर. जी. भोयर आणि डॉ. उर्मिला डबीर आदि व्यवस्थापन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
विद्यापीठाशी संबंधित कामे पूर्ण करुन घेण्यासाठी नागपूर विद्यापीठ आणि व्यवस्थापन समितीने रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या काम करण्याच्या पॅटर्नचा अवलंब करण्याचे निर्देश श्री. सामंत यांनी दिले.
विद्यापीठाची व्यवस्थापन समिती ही स्वायत्त असली तरीही राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाशी समन्वय ठेवण्यात कोणतेही नुकसान नाही. शासनाकडे असलेली कामे पूर्णत्वास नेण्यासाठी योग्य समन्वय आणि सततचा पाठपुरावा करणे हे व्यवस्थापन समितीचे काम असल्याचे सांगून ही समिती कामासंदर्भात समन्वय ठेवत नसल्याची नाराजी श्री. सामंत यांनी व्यक्त केली.
जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसोबत विद्यापीठ प्रशासनाने सलोख्याचे संबंध ठेवावेत. त्यातून विद्यापीठाची कामे मार्गी लागण्यास मदत होते. कामे मार्गी लावताना राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देत श्री. सामंत यांनी राज्य शासनाने आदेश दिल्यानंतरही नागपूर विद्यापीठ प्रशासनाने गोंडवाना विद्यापीठाचा एकूण साडेचार लाख रुपयांचा निधी अडवून ठेवल्यामुळे आदर्श कॉलेज अडचणीत आणल्याचे ते म्हणाले. हा निधी वळता करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची परवानगी लागत असेल तर त्याबाबत विभागाला अवगत करायला हवे होते. मात्र व्यवस्थापन समितीच्या नावाने अडवणूक करू नये. गडचिरोली येथील एका महाविद्यालयाची तक्रार सोडवण्याचे निर्देश दिले.
यावेळी शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचा-यांच्या वेतनाचा प्रश्न सोडविणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना कंत्राटी तत्त्वानुसार वेतन देणे, त्यांच्या तासिका वाढविणे, इतर महाविद्यालयांमध्ये तासिका घेण्यास परवानगी देणे, तसेच नेट-सेट उत्तीर्ण उमेदवारांच्या प्राध्यापक भरतीसंदर्भात योग्य ती कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे श्री. सामंत म्हणाले.
*फुले – शाहू – आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करा*
विद्यापीठात आंतरराष्ट्रीय फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमाला आयोजित करुन त्यातून तीन समाजसुधारकांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी विद्यापीठ प्रशासनाला 25 लाख रुपयांचा निधी दिला. मात्र विद्यापीठाने ही व्याख्यानमाला आयोजित केली नाही. ती आयोजित न करण्यामागचे कारणही विद्यापीठाने सांगितले नसल्याचे श्री. राऊत यांनी सांगितले. त्यावर श्री. हिरेखन यांच्या उत्तरावर पालकमंत्र्यांचे समाधान न झाल्याने व्याख्यानमाला आयोजित करत नसल्यास निधी परत करण्याबाबत सांगितले. तसेच यावेळी श्री. राऊत यांनी नागपूर विद्यापीठात बीएससी एव्हीएशन आणि एचआर असे अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत श्री. सामंत यांच्याशी चर्चा केली.
नागपूर येथील विभागीय सहसंचालक डॉ. साळुंखे यांच्या भ्रष्टाचाराबाबत केलेल्या वक्तव्याच्या वृत्ताची श्री. सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून, संचालक डॉ. धनराज माने यांना या प्रकरणाची 15 दिवसांमध्ये चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रकरणाची माहिती मिळत नसल्यास कॉल डिटेल्ससाठी सायबर शाखेकडे तक्रार करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही श्री. सामंत म्हणाले.
*विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमासाठी नियोजन करा*
रा. तु. मं. विद्यापीठाच्या शतकपूर्ती कार्यक्रमासाठी नियोजन करा. त्यासाठी पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून समितीचा अहवाल सादर करावा. आवश्यक बाबींसाठी निधी दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच नागपूर विद्यापीठात विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभारण्यासाठीचे प्रस्ताव तयार करुन पाठपुरावा करावा. याबाबत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत बैठक आयोजित करुन वसतिगृह बांधकामाच्या प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येईल, असे श्री. सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला सांगितले.