समृद्ध कोकणासाठी तरुण उद्योजक निर्माण व्हावेत:
श्री.शैलेंद्र रावराणे
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियानांतर्गत एक दिवशीय उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न झाले.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक शिक्षण तसेच कौशल्यावर आधारित शिक्षण या मार्गदर्शक तत्त्वानुसार महाविद्यालयांमध्ये एक दिवशीय उद्योजकता विकास कार्यशाळेमध्ये काजू प्रक्रिये संबंधित वेदांत ऍग्रो प्रॉडक्ट्स नांदगाव चे श्री.रविंद्र गोविंद बोभाटे आणि आंबा प्रक्रिया उद्योगासंबंधित सौ. अनुपमा पांडुरंग मोरे व पांडुरंग मारुती मोरे कोल्हापूर या तज्ञ व अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी एकूण ६९ विद्यार्थ्यांनी आपली नाव नोंदणी करून आपला सहभाग नोंदवला होता.
कार्यशाळेचे उद्घाटन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे सचिव व या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. शैलेंद्र रावराणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना कोकण हा जैवविविधता व नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध आहे. आंबा, काजू, फणस, रतांबा व जांभूळ अशा अनेकविध फळांची मुबलक उपलब्धता आहे. त्यामुळे युवकांनी नोकरी मागे न धावता व्यावसायिक व कौशल्यावर आधार शिक्षणाच्या माध्यमातून फळ प्रक्रिया उद्योग सुरू करुन युवकांनी स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात आणि समृद्ध कोकणचे स्वप्न साकार करावे. तसेच जागतिक पातळीवर आपल्या देशाला सशक्त व आत्मनिर्भर बनविण्यामध्ये आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन केले तर कोषाध्यक्ष मा. श्री.अर्जुन रावराणे यांनी आजच्या अनुभवी व तज्ञ मार्गदर्शनातून आपल्या जीवनाच्या वाटा विद्यार्थ्यांनी शोधल्या पाहिजे व आपले कुटुंबाचे आणि समाजाचे जीवन आर्थिक दृष्ट्या संपन्न करावे असे आवाहन करुन कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे विश्वस्त शरदचंद्र रावराणे, प्र.प्राचार्य डॉ.एन व्ही गवळी, कार्यालयीन अधीक्षक श्री.संजय रावराणे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर सिरसट व प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेचे समन्वयक डॉ. किरण पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. एम आय कुंभार यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून एक दिवशीय उद्योजकता विकास कार्यशाळेच्या आयोजनाचा उद्देश सांगून त्याची रूपरेषा स्पष्ट केली. पाहुण्यांचा परिचय प्रा.आर.बी. पाटील यांनी केला तर प्रा.पी ए. दाणी यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रामध्ये श्री. रवींद्र बोभाटे यांनी व्यवसायिक सुरुवात, संघर्ष व यशोगाथा विद्यार्थ्यांना सांगितली व कोकणामध्ये दर्जेदार व मुबलक प्रमाणात काजू उपलब्ध आहेत या काजू बियांवर प्रक्रिया करून उत्कृष्ट प्रतीचे काजूगर उत्पादन करता येतात. काजू बियांच्या उपलब्धतेपासून प्रत्यक्ष काजूगराच्या निर्मितीपर्यंतची सर्व प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते याचे सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. उद्योगांमध्ये विपुल प्रमाणात युवकांना स्वयंरोजगाराची संधी असून दूरदृष्टी जिद्द मेहनत चिकाटीच्या आधारे आपला आर्थिक विकास करता येईल. यावेळी स्टिमिंग, कटिंग, फिनिशिंग, ग्रेडिंग या सर्व प्रक्रियेची माहिती चित्रफितीच्या सहाय्याने दिली. तसेच जे विद्यार्थी काजू प्रक्रिया उद्योगांमध्ये येण्यास इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांना विना शुल्क प्रशिक्षण देण्याची ग्वाही दिली.
कार्यशाळेतील दुसऱ्या सत्रामध्ये यशस्वी महिला उद्योजक अनुपमा मोरे यांनी पदवी शिक्षण घेऊन नोकरीसाठी फिरताना आलेले अनुभव, समस्या आणि त्यातून जीवनाला मिळालेली कलाटणी विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडली. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना केवळ इतर कंपनीचे एक किलो आंब्याचे लोणचे आणून तेच बाजारात शंभर रुपयाला विकताना आलेल्या अनुभवातून आंबा.लिंबू, मिरची, मुळा, कारले, करवंद, चिंच व आवळा अशा विविध लोणच्याचे १२५ टनापर्यंत (१२५००० किलो) उत्पादन करण्याचे शिव धनुष्य समर्थपणे पेलण्याचा प्रवास ऐकताना विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. श्री. पांडुरंग मोरे यांनी सर्व प्रकारची लोणची करण्याची प्रक्रिया व त्यासाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांना आपल्या ओघवत्या शैलीमध्ये सांगितले. श्री. प्रमोद पाटील यांनी एकूण विक्री व विपणन व्यवस्था व यशाची सप्तसुत्री विद्यार्थ्यांपुढे प्रभावीपणे मांडली व कोणत्याही उद्योगांमध्ये यशस्वी होण्याचा कानमंत्र दिला. विद्यार्थ्यांना आंबा प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहा. प्रा. आर.बी. पाटील, प्रा.आर एस भोसले, प्रा. पी ए. दाणी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेसाठी इतिहास विभाग प्रमुख एस.एन.पाटील व इतर सहकारी उपस्थित होते. प्रा.आर.ए.भोसले यांनी कार्यशाळेचे सूत्रसंचालन केले.

