*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार ज्येष्ठ साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट:२६*
*गोकूळ*
काकल्या घरी आला होता, तेव्हा दोन दिवसावर जन्माष्टमी होती. अर्थात त्यामुळे त्याच्या डोक्यात कृष्ण असणार हे साहजिकच. त्याचे तर्कट भगवंताच्या दिशेने असणार याचा मला अंदाज होता; मीही काहीसा तयारीत होतो.
आल्या आल्या त्याने विचारलेच की, “तुम्ही गोकुळ पुजतांस?”
” हो, अरे सगळेच पुजतात.” मी उत्तरलो.
“चुकीचा. आमच्या पूऱ्या आवाटात एकठयच आसता.”काकल्याने खोड काढली.
” मग तू जात नाहीस तिथे? जातोस ना. काहीजण स्वतंत्र, काही सामुदायिक; पण श्रीकृष्ण सगळेच पुजतात. अरे, माझे बाबा म्हणायचे, वर्षातून तीन वेळा आपण मातीची पूजा करावी. नाग, श्रीकृष्ण आणि गणपती” मी समजावत होतो.
“तीन येळा माती पुजूची, मगे राम कित्या नको?”काकल्याला पूजनापेक्षा तर्कट लावण्यात जास्त आनंद वाटे.
” हे बघ. कृष्ण पूर्णावतार. देवाच्या दशावतारातील राम हे साधकचे रूप आहे, तर कृष्ण हे सिद्धाचे रूप. सामान्य, भोळ्या जगाचा चमत्कारांवर विश्वास बसतो. चमत्काराच्या निमित्ताने एकदा का श्रद्धा बसली की, लोक गीतेतील तत्वज्ञानाकडे वळतील, असा पूर्वजांचा समज असावा.” मी अजून समजावले.
“पून तो सोळा हजार बायलेंचो दादलो मां?” काकल्या एका ठिकाणी निरुत्तर झाला की, दुसरा मुद्दा शोधतो.
“हे बघ, एकतर असं बोलणं बरं नव्हे. भगवंतानी भोगासाठी नाही ,तर नरकासूराच वध झाल्याने निराधार बनलेल्या बंदिवासातील शोषित स्त्रियांशी विवाह करून त्याना आधार दिला. समाजाच्या प्रवाहात आणले. विधवाविवाहाचे, स्त्री सन्मानाचे केवढं मोठं उदाहरण आहे हे. अरे, विसंगती शोधण्यापेक्षा सुसंगती लावण्यात समाधान असते हे जरा शिक.”मी जरा जोरातच म्हणालो.
“आता माजा आयक्. निस्ती गोडसाण चलणा नाय रे, हिमसाण पण होयीच. दिस होयो तशी रातय होयी. झील होयो तसा चेडूय होया. देव होयो आणि राक्षसय होयो. नायतर सगळा पचपचीत जातला मरे. हूनान मी राक्षसाची बाजू मांडतय, तुया देवाची मांड. तू गोकूळ हाड,मी दिवाळेक नरकासूर करतय. आणखीन याक,मिया नाय इलय तरी माका अष्टमीच्या परसादाचा पचखाजा मात्र राखून ठेय हां” शेरावर आपला सव्वाशेर ठेवून काकल्या निघून गेला.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802
