अंगारकी संकष्टीला घोणसरीतील स्वयंभू श्री. गणपती मंदिरात भाविकांची गर्दी
फोंडाघाट (प्रतिनिधी)
आज अंगारकी संकष्टीच्या पवित्र दिवशी घोणसरी येथील स्वयंभू श्री. गणपती मंदिरात भाविकांनी सकाळपासून मोठ्या संख्येने दर्शनासाठी हजेरी लावली. भरपूर पावसाचे वातावरण असतानाही श्रद्धेने ओतप्रोत भरलेल्या महिला, पुरुष, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी श्री. गणपतीचे दर्शन घेतले.
फोंडाघाट परिसरातील श्री. गणपती नवसाचा देव मानला जातो. त्यामुळे अनेक व्यापारी आणि नागरिक अंगारकीच्या दिवशी विशेषतः या मंदिरात दर्शनासाठी येतात. देवाच्या कृपेने आपली कामे यशस्वी व्हावीत, कुटुंब सुखी राहावे आणि आरोग्य उत्तम राहावे, यासाठी हे दर्शन घेतले जाते.
सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनीही आज श्री. गणपतीचे दर्शन घेतले. “संपूर्ण कुटुंबाचे रक्षण कर आणि सर्वांना सुदृढ आरोग्य लाभू दे,” अशी मनोकामना त्यांनी श्री. गणपतीच्या चरणी व्यक्त केली. “या देवळात गेल्यावर एक आत्मिक समाधान मिळते,” असेही ते म्हणाले.
मंदिराबाहेर नव्याने उभारण्यात आलेल्या द्वारपाल मूर्तीमुळे मंदिराची शोभा अधिक वाढली आहे. मंदिर व्यवस्थापनाने भाविकांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली होती.
