*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*श्रावणात मन मोरपिसारा…*
श्रावणात मन मोरपिसारा भवती भणभण वारा
सरसर शिरवे भिजवून जाती कोसळती मग धारा..
ऊन कोवळे अंगणी पडते दंवबिंदू हासती
चमचम करती तृणपात्यांवर पाणीदार ते मोती
मनमोहक ते दृश्यच सारे हिरवागार नजारा…
पक्षी नाचती फुले हासती भुंगे गुणगुण करती
फुलपांखरे नर्तन करती फुलांवरी ती बसती
मिचकावून डोळे दंवबिंदू करतो गोड इशारा…
इरली इरली बांधावरती चिखलमाती तुडवित
रोपे लावती भाताची ती शेतकरी चिखलात
ज्वाऱ्या बाजऱ्या हिरवा शालू उडवी खट्याळ वारा..
मंदिरात ते गाती भक्तगण टाळ चिपळ्या मृदुंग
तारस्वरी ते म्हटले जाती राऊळात अभंग
विणावादन मनमोहक ते भक्तीचाच तो पसारा..
क्षणात ऊन ते क्षणात पाऊस झरझर झरते झारी
झपाझप ती मंदिरी जाते नऊवारीतील नारी
इंद्रधनूचा गोफ उलगडे त्यात उन्हातच धारा…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
