You are currently viewing मच्छीमारांच्या लढ्यासाठी शिवसेनेचा मोर्चा सज्ज; राजा गांवकर यांच्यावर दुहेरी जबाबदारी

मच्छीमारांच्या लढ्यासाठी शिवसेनेचा मोर्चा सज्ज; राजा गांवकर यांच्यावर दुहेरी जबाबदारी

आगामी निवडणुकांसाठी शिवसेना संघटना सज्ज; शहरातील २० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी

मालवण :

शिवसेना मच्छीमार सेलच्या जिल्हाप्रमुखपदाबरोबरच जिल्हा प्रवक्त्याची जबाबदारी राजा गांवकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे मच्छीमार समाजातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून अधिक प्रभावी पद्धतीने काम केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मालवण येथील शिवसेना कार्यालयात नव्याने नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी जिल्हाप्रमुख राजा गांवकर म्हणाले, “पक्षाची ध्येय–धोरणे प्रत्येक मच्छीमार बांधवापर्यंत पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मच्छीमार हा समाजातील मोठा घटक आहे. किनारपट्टीवरील धूप प्रतिबंधक बंधारे, परप्रांतीय ट्रॉलर्सवरील कारवाई, तसेच रो-रो बोट सेवा मालवण व वेंगुर्ला बंदरापर्यंत सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मच्छीमारांचे प्रश्न सोडवले जातील.”

ते पुढे म्हणाले की, आमदार निलेश राणे यांनी आपल्या पहिल्याच विधानसभेतील भाषणात मच्छीमारांच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली आहे आणि किनारपट्टी विकासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

या पत्रकार परिषदेस शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख व कणकवली विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, जिल्हा समन्वयक व माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख दीपक पाटकर, तसेच विश्वास गावकर, बाळू नाटेकर, आबा शिरसेकर, शिवाजी केळुस्कर, राजेंद्र परुळेकर, अरुण तोडणकर, बाळा जाधव, अंजना सामंत, सोनाली पाटकर, गीता नाटेकर, मार्टिन फर्नांडिस, कविता मोंडकर, मधुरा तुळसकर, संदीप भोजने, प्रदीप मोर्जे, निलेश पालेकर, राजू बिडये, अभय कदम, विलास मुणगेकर, संग्राम साळस्कर, आनंद खवणेकर, भाई मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे यांनी सांगितले की, “कणकवली मतदारसंघात शिवसेनेची संघटना वाढवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि आमदार निलेश राणे यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही.”

जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर म्हणाले, “जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आत्ताची शिवसेना जोमाने उभी राहत आहे. गावागावातील कार्यकर्त्यांचा ओढा वाढत असून कोट्यवधी रुपयांचा निधी मतदारसंघासाठी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रलंबित विकासकामांना गती मिळत आहे, ज्यामुळे संघटना आणखी बळकट होईल.”

शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी सांगितले की, “शहरातील सर्व विभागात पदाधिकारी नियुक्त झाले आहेत. आमच्यात शहरातील २० जागांवर उमेदवार उभे करण्याची ताकद निर्माण झाली आहे. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत.”

या पत्रकार परिषदेत मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर पक्षाच्या आगामी लढ्याचा आराखडा मांडण्यात आला. किनारपट्टीवरील विकास, मच्छीमारांचे हक्क आणि संघटनेची ताकद वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये दृढनिश्चय दिसून आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा