शांतता समिती बैठकीत पार्किंग, परप्रांतीय व चोरीच्या घटनांवर चर्चा
सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली, ज्यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी शहरातील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नगरपरिषदेसोबत चर्चा करून एका बाजूने दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. पार्किंग नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, तर गणेश चतुर्थीच्या काळात पार्किंगबाबत विशेष कठोरता दाखवली जाईल. यापूर्वी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात लावण्यात आलेल्या पार्किंग फलकांचा संदर्भ माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी दिला.
शहरात वाढलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासावरही सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यावर पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी फेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आणि परप्रांतीय भाडोत्री लोकांची नोंदणी तपासण्याचे आश्वासन दिले.
सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी जनतेने संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले. जनता व पोलिस यांच्या समन्वयाने सण शांततेत पार पाडण्याचे आवाहन पोलिसांनी केले.
या बैठकीला सहाय्यक पोलीस निरीक्षक खंदरकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हिदायततुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, नंदू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
