नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : आयोजकांचे आवाहन
सावंतवाडी | प्रतिनिधी:
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर, आता ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सर्वत्र संचारलेला असताना, सावंतवाडी शहरही या राष्ट्रीय पर्वाच्या तयारीमध्ये रमून गेले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी उद्या मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी शहरात भव्य ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन करण्यात आले आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाला आदरांजली वाहण्याचा एक विनम्र प्रयत्न असणार आहे.
येथील ऐतिहासिक संस्थानकालीन राजवाड्याच्या प्रांगणातून सकाळी १०.३० वाजता या रॅलीचा शुभारंभ होणार आहे. देशाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभे असलेल्या या वास्तूच्या साक्षीने, हातात तिरंगा घेऊन निघालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरणार आहे. देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे स्मरण करत आणि त्यांच्या स्वप्नातील भारत घडवण्याची शपथ घेत, ही रॅली पुढे सरकेल.
या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी आयोजकांनी सर्व सावंतवाडीवासीयांना नम्र आवाहन केले आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिक अशा सर्वांनी या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होऊन, आपल्या देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
हातात तिरंगा घेऊन, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषात निघालेली ही रॅली शहरातील वातावरणात देशभक्तीची एक वेगळीच लाट निर्माण करेल. ७९ वर्षांपूर्वी देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यासाठी अनेक ज्ञात-अज्ञात वीरांनी दिलेले योगदान, याची आठवण करून देणारा हा सोहळा प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची ज्योत अधिक प्रज्वलित करणार असून या रॅली जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

