पुणे :
हे मिळालेले स्वातंत्र्य अंगावरचे कापड आहे. ते कसेही असले तरी त्याचे संरक्षण करणे हे क्रांतीकारी कार्य आहे. क्रांतीचे पाऊल कोणत्याही जातीच्या व्यक्तीने टाको, त्याच्या पाठीशी आपण खंबीर असले पाहिजे. लोकशाहीची चोरी होत आहे. आपण आपल्या जगण्याची शहानिशा केली पाहिजे, आपले आपण चिंतन केले पाहिजे आणि माणूस वाचवण्यासाठी निर्भय झालेच पाहिजे. चालू परिस्थितीवर न लिहिणारे लेखक कवी नपुसक आहेत. आमचे लिखाण एक क्रांतिकारी दृष्टीने कर्तव्य म्हणून असले पाहिजे. क्रांतीची सुरुवात घरातून व्हायला हवी. चुकलेल्या बापालाही बडवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे. घटनेचे रक्षण करणारा कोणीही माझा प्रियबंधू आहे. असे परखड मत सुप्रसिद्ध गझलकार, बोल्ड कवी म.भा. चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
नऊ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महामाता रमामाई बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि साहित्य सम्राट पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रांतिकारी कवींचे २०९ वे कवीसंमेलन वाडिया कॉलेज जवळ महामाता रमाबाई राष्ट्रीय स्मारक येथे आयोजित केले होते.
क्रांतिदिनाच्या कविता या विषयावर झालेल्या कवी संमेलनाची सुरुवात महामाता रमाबाई यांना पुष्पहार तसेच बोधिवृक्षास मान्यवरांच्या हस्ते पाणी घालून करण्यात आली.
म. भा. यांनी कवीसंमेलनाची सुरुवात क्रांतिकारी प्रबोधनात्मक अशी केली. देशात चाललेल्या विषमतेवर भाष्य करणारी कविता सादर करताना ते म्हणतात –
या देशाला धर्म कशाला
घटना ठेवा रोज उशाला
एक तिरंगा असे पुरेसा
मानवतेच्या धवल यशाला
ज्येष्ठकवी बाबा ठाकूर यांनी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या शेवपेटीसमोर, आईने काढलेले हृदयस्पर्शी उद्गार आपल्या क्रांतिकारी कवितेतून म्हणतात –
ते म्हणतात या पेटीत पोरगा तुझा आहे गेला
तेव्हा म्हणाला, माये येतो गं बोलला मर्दानी ढंगात
असा कसा हो तो परत येईल या तीन रंगात
या पेटीत माझा पोरगा नाही.
कवी दशरथ दुनघव हे साहित्य हे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी सांगितल्याप्रमाणे क्रांतिकारी असावे असे सांगताना म्हणतात –
अण्णाभाऊंचे साहित्य हे शब्दांचे तलवार होती.
भल्याभल्यांना घाम फोडणारी तिला धार होती
कवी.डॉ.आनंद महाजन देशातील वास्तवादाचे स्वरूप दाखवताना आपल्या कवितेतून म्हणतात –
हा तर देश माझाच आहे बहुतेक सारे देश बांधव
शक्य तितके लाभार्थी आहेत. येथील पैशावर आमचे केवढे प्रेम आहे.
आमच्या समृद्ध आणि विविधतेने विभूषित परंपरांचा मला तिटकारा आहे.
साहित्य सम्राटचे संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ देशाचे स्वातंत्र्य अजूनही सामान्य घटकांपर्यंत पोहोचलेच नाही. हे आपल्या सुप्रसिद्ध १६ ऑगस्ट ओरडला या कवितेतून निर्भीडपणे मांडताना म्हणतात –
ये स्वातंत्र्या -?
तू कोणासाठी ? आमच्या पिढ्या
कसल्या मातीत, खपल्या हमालीत,
झिजल्या काळ्याकुट्ट खाणीत
अन् तडफडून मेल्या घाणीत
अजूनही – –
अशा अनेक क्रांतिकारी कवी. डॉ.समिंदर घोक्षे, बबन चव्हाण, एन गावडे, अजय पारधे आणि रमाईपुत्र आयु विठ्ठल गायकवाड यांनी सुद्धा आपल्या प्रबोधनात्मक क्रांतिकारी कवितांनी कवीसंमेलन गाजवले.
कार्यक्रमाचे स्वागत, संविधान उद्देशिकेचे वाचन आणि क्रांतिकारी सूत्रसंचालन विनोद अष्टुळ यांनी तर सर्वांचा सन्मान, प्रास्ताविक आणि आभार विठ्ठल गायकवाड यांनी भारदस्त विचारांतून व्यक्त केले.

