*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*
*दृढ श्रद्धाभाव आणि प्रचिती*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
पारतंत्र्यातील इंग्रज काळातील एक सुसंस्कृत विद्यमान स्त्री *कमळा*…
1942 साली सेवासदन पुणे इथून जुनी 11 वी म्हणजे एसएससी झालेली कमळा की जीने सेवासदनच्या गच्चीवरून स्वातंत्र्य लढा पहिला पाहिला होता तो काळ.. त्या काळात शाळेत मराठी , संस्कृत , हिंदी , इंग्रजी भाषा शिकलेली स्त्री..*सर्वार्थाने सुंदर आणि हिंदू संस्कृतीत संस्कारांची जडणघडण झालेली स्त्री तिची आई लक्ष्मीबाई त्याकाळी जोगेश्वरी , सारसबाग , चतुशृंगीला बग्गीतून जात असे कमळा सांगत असे.. कमळा म्हणजे माझी जन्मदात्री* की 96 वर्षे जगली होती.
माहेर आणि सासर घरंदाज सुशिक्षित असून देखील धार्मिक व्रतवैकल्ये , सणवार या साऱ्या पारंपरिक गोष्टी ती अगदी निरलस श्रद्धेने करीत असे. आज मला हे सारे आठवते..
आमच्या घरात माझ्या वडिलांची आजी म्हणजे पणजी होती ( वडिलांची आई त्यांच्या लहानपणीच दिवंगत झाली होती त्यामुळे वडिलांच्या आजीने त्यांना सांभाळले होते) ती पणजी म्हणजे *यमु* खूप वयस्कर म्हणजे 90/92 ची असावी ,(मी माझ्या बालवयात तिला पाहिल्याचे आठवते आहे. अत्यन्त कर्मठ , करारी विधवा म्हणजे (सोळी, केशवपन केलेली होती ) . तिचा सर्वाना खूप धाक असे. माझ्या आईची आई देखील लक्ष्मीबाई वय वर्षे साधारण 80/85 मला आठवते ती मात्र एकदम शांत. आम्हा मुलांचे लाड पुरवीत असे. *यमु देखील वयस्कर होती तरी सुंदर होती *आलवन* (लाल साडी ) नेसलेली आठवते. तिच्या सुरकुतलेल्या हाताचा रेशीमस्पर्ष आजही मला स्मरतो आहे. यमू थोडीशी कमरेत वाकली होती , चष्मा नाही , माजघरात निवडणे , टिपणे तिचे चालत असे. काठी घेवुन चालत असे . पेठेत कुठे काही झाले की माणसे तिचा सल्ला घ्यायला येत असत. ती सकाळी पहाटेच उठत असे आम्हालाही उठवत असे तिचा दराराही सर्वश्रुत होता. तीही तीच सारं उरकलं की देवाला पहाटेच काकड आरतीला जात असे. पण *मुखाने सदैव तिचा ” राम, राम , राम ,राम अखंड जप चालत असे.*
” राममंदिरात गेली की ती 2 / 3-तास तिथं चौथऱ्यावर बसून राम , राम , राम म्हणतच येणाऱ्या प्रत्येक भक्ताला तिच्या झारीतून तीर्थ देत असे..तिला गैर काहीच चालत नसे. त्यामुळे तिला सारे वचकून असत हे मात्र खरे.
माझ्या आईलाही तिचा खूप धाक होता. घरी सोवळे , ओवळे प्रचंड होते.
सर्वांच्या अंघोळी पहाटे 4।। ला झालेल्या असत. तो एक खूप चांगला संस्कार होता. घरातले सारे वातावरण खुपच धार्मिक होते. माझे वडील , काका देखील यमुच्या धाकात असत . पूजापाठ, रुद्रपठण , आरत्या , वेदपठण, इतर सारी व्रतवैकल्ये घरात नित्य होत असत. घरी अंगणात एक छोटीशी पण सुंदर बाग होती. तुळशी वृंदावन होते. पावित्र्य होते.
चातुर्मासात घरात कीर्तनकार , प्रवचनकार हे 4/4 महिने आमच्या घरीच मुक्कामास असत. या सर्वांमुळे आम्हा मुलांवर त्याचेच संस्कार झाले हे खूप महत्वाचे.
*या साऱ्या वातावरणात माझी सुशिक्षित आई कमळा देखील सरावून गेली.* पणजी यमु जरी कर्मठ असली तरी आई मात्र खूप समंजस आणि कर्तव्यतत्पर होती. ती घरातले पारंपारिक सणउत्सव अगदी यथासांग करीत असे. ती शिकलेली असून देखील खूपच श्रद्धाळू होती.
*काळानुरूप पडझड झाली माणसे हरविली देखील पण त्यांनी केलेले संस्कार आजही जीवंत आहेत हे महत्वाचे..*
एकेकाळी मी माझ्या आईच्या बोटाला धरून मंदिरात जात असे तर आता आईच माझ्या बोटाला धरून मंदिरात येऊ लागली होती . *घर म्हणजे गौकुळ होतं*
अनेक गोष्टी आठवतात…. त्या पैकी एक म्हणजे…
सातारा या अत्यन्त सुंदर आणि निसर्गाचं वरदान लाभलेलं रम्य असं पहाडीदुर्गात वसलेलं टुमदार गाव तिथं एक देगाव फाट्यावर *टेकडीवर पाटेश्वर नावाचं महादेवाच्या कोटी पिंडी असलेलं मंदिर देवस्थान आहे.*
माझी आई किंवा तिच्या मैत्रीणी नेहमीच देवदर्शनाला जात असत.
त्यापैकी *पाटेश्वर* हे ही एक ठिकाण होतं.
मी एकदा आईला घेवून तिच्या सोबत गेल्याचे मला आठवते आहे..
त्या टेकडीवर दगडी बांधकाम असलेलं सुंदर मंदिर आहे आणि त्या परिसरात असंख्य महादेवाच्या पिंडी आहेत की त्या मोजता येतच नाही हा दुर्मिळ साक्षात्कार आहे हे ही खरे..
*आई नेहमी जात असे*
यावेळी नेहमी प्रमाणे ती गेली मीही तिच्याबरोबर होतो. तिथे असलेले महाराज देखील भेटले. आईच्या मनात तिथे मंदिरात नेहमीप्रणाने फुलवाती लावाव्यात असे होते. संध्याकाळ झाल्यामुळे त्या दगडी सभामंडपात आता अंधारले होते. काही दिसत नव्हते.आम्ही मंदिरात गेलो पण त्याअंधारात आईला फुलवात लावता येईना..बराच वेळ गेला.आईचे मन उदास झाले. आम्ही परत फिरून महाराजांच्या कडे आलो त्यांना वस्तुस्थिती सांगितली ते म्हणाले असे होणार नाही.तुम्ही पुन्हा एकदा जा..पहा तिथे तुम्हाला एखादी तरी ज्योत दिसेल.
आम्ही परत मंदिरात गेलो. तरीही आम्हाला ज्योत दिसेना , फुलवात लावता येईना मग नमस्कार करून मी व आई परत निघालो पण आईची श्रद्धा एव्हडी होती की ती म्हणाली असे कधीच झाले नाही ..माझा पाय इथून निघत नाही…तीन तास तिथे थांबून देखील आम्हाला ज्योत सापडली नाही परंतु अगदी कंटाळून आईने आशेने पुन्हा आत वळून पाहिले तर तिथे लांबवर एक छोटीशी मिणमिणती फुलवात तेवत असलेली दृष्टी पडली. मग पुन्हा आम्ही मंदिरात त्या वातीपाशी गेलो आणि त्या वातीने आईच्या जवळील 21 वाती लावल्या तेंव्हा गाभारा उजळून गेला…
*ही आईच्या दृढश्रद्धेची प्रचिती होती*
असे अनेक अनुभव आहेत….
*@ वि.ग.सातपुते.*
🙏

