कोलगावात एस.टी.बसखाली येऊन दुचाकीस्वार ठार
सावंतवाडी
सावंतवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या सावंतवाडी – कणकवली एसटीचे उजवे चाक अंगावरून गेल्याने माजगाव ,(कुंभारवाडा) ता .सावंतवाडी येथील रुपेश अनिल पाटकर ( ३२ ) हे जागीच ठार झाले . हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय जवळ घडला . रुपेश पाटकर हे सावंतवाडीहून कुडाळला जात असताना कोलगाव येथे आले असता रस्त्याच्या साईडपट्टीला असलेल्या गेटला आदळल्याने रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. तेव्हा मागून येत असलेल्या सावंतवाडी – कणकवली एसटीचे चाक त्यांच्या अंगावरून गेले .अपघाताची खबर मिळताच माजगाव ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . जोपर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत येथून मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे.मयत रुपेश पाटकर हे व्ही गार्ड एजन्सी चालवत होते . काही महिन्यांपूर्वीच रुपेश यांचा विवाह झाला होता. रुपेश यांचा स्वभाव हसतमुख आणि मनमिळावू होता . त्यांच्या मृत्यूने माजगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे .

