*कवयित्री चित्रा चौधरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*रक्षाबंधन*
भावाबहिणीच्या प्रेमाची, महती सांगे हा सण
रेशीमधागे गुंफुनी देती, प्रेमाचे वरदान ।।१।।
या जिव्हाळ्याची हाक तुझी, गोंदुनी ठेविली अंतरी
आशीर्वादाची तुझी शिदोरी, पुरेल मजसी जन्मभरी ।।२।।
विश्वास, प्रेम निस्वार्थतेचे, ओलेचिंब रक्ताचे नाते
इंद्रधनूचा मयुर पिसारा, अलगद खुलवून जाते ।।३।।
आपुलकीची ओंजळ करुनी वर्षावाची सूर होऊन
दीर्घायुष्य लाभो तुजला,
देते आनंदाचे दान ।।४।।
माणुसकीच्या सुवर्णपंखाने, घेऊ गगनभरारी
नात्याची गुंफण घट्ट होऊ दे, हीच इच्छा मम अंतरी ।।५।।
पावित्र्याची मंगल भावना, सुखाची कशाला गणती
लक्षदिव्यांच्या प्रकाशाने, उजळे बहीण भावाची प्रीती ।।६।।
सौ. चित्रा पुरुषोत्तम चौधरी
सिद्धिविनायक नगर वि.म.वि.
अमरावती 4

