राकेश परब मित्रमंडळातर्फे नारळ लढविण्याची स्पर्धा उद्या विरणमध्ये
विजेत्यांना रोख बक्षिसे आणि चषक
मालवण : प्रतिनिधी
राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने नारळ लढविण्याची स्पर्धा उद्या गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विरण बाजारपेठेतील हनुमान मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा परिसरातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणारी असून, स्थानिक नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक म्हणून ५ हजार रुपये आणि आकर्षक चषक, तर द्वितीय पारितोषिक ३ हजार रुपये आणि चषक असे ठेवण्यात आले आहे. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आयोजक मंडळातर्फे ५ नारळ देण्यात येणार आहेत. पहिल्या ७० स्पर्धकांना स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे.
स्पर्धेतील शिस्त कायम राखण्यासाठी मद्यप्राशन केलेल्या स्पर्धकाला थेट बाद करण्यात येईल, असा स्पष्ट नियम आयोजकांनी जाहीर केला आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी २०० रुपये ठेवण्यात आली असून इच्छुकांनी यश पांजरी (मो. ९८३४१९२९५९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
