फोंडाघाट येथे मोफत कॅन्सर व आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी; ग्रामस्थांतून उत्स्फूर्त प्रतिसाद
फोंडाघाट
राधाकृष्ण मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्याच्या वतीने मोफत कॅन्सर आणि इतर आजारांच्या निदानासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आशा व अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली.
या उपक्रमासाठी श्री. भावेश कराळे आणि अजित नाडकर्णी यांनी राधाकृष्ण मंगल कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाची सुरुवात सरपंच संजना आग्रे यांच्या हस्ते नारळ फोडून व दीप प्रज्वलित करून करण्यात आली.
कार्यक्रमास माजी पंचायत समिती सभापती सौ. हळदिवे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य पिंटू पटेल, पवन भोगले, डॉ. यादव (फोंडाघाट मेडिकल ऑफिसर), वैभववाडीचे वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ, अॅम्ब्युलन्स चालक अजित सापळे तसेच जिल्हा वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांनी अजित नाडकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी सौ. काळगे मॅडम यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. त्या फोंडाघाटमधील डॉ. श्री. काळगे यांच्या पत्नी असून सरपंच संजना आग्रे यांनीही त्यांचा सत्कार केला.
सौ. काळगे मॅडम यांनी समाजकार्याच्या दृष्टीने कायम राधाकृष्ण मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. शेवटी माजी सभापती हळदिवे मॅडम यांनी आभार प्रदर्शन केले. यानंतर रुग्णांची तपासणी व विविध टेस्टिंगचे काम सुरु झाले.
