“प्रेरणा आणि संस्कारामधूनच राष्ट्रभक्ती प्रखर होते”…
मा. राजेंद्रजी आर्लैकर, राज्यपाल केरळ….
काल सहा आॅगस्ट रोजी दीनानाथ मंगेशकर सभागृह, कला अकादमी पणजी गोवा येथे केरळचे मा. राज्यपाल राजेंद्रजी आर्लैकर यांच्या संकल्पनेतून चैतन्य प्रतिष्ठान, गोवा यानी आयोजित केलेला एक अनोखा व प्रेरणादायी कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. अर्थात मा. आर्लैकर सरांनी आवर्जून पाठवलेले निमंत्रण आणि निमंत्रण पञिकेवरील विषय पाहून या कार्यक्रमात उपस्थित राहिलो.
“एक राखी, सैनिकांसाठी” या संकल्पनेतून हा प्रखर राष्ट्रभक्तीचा जागर करणारा नीटनेटका आणि सिमेवर लढणाऱ्या आमच्या सैनिकांसाठी अभिवादन करणारा कार्यक्रम रंगत गेला. राष्ट्रभक्तीचे स्फुल्लिंग पेटवून शाळेतील मुलांमध्ये राष्ट्रीशक्ती निर्माण करणाऱ्या या हटके कार्यक्रमात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले होते. शाळेतील मुलांनी सादर केलेली देशभक्तीपर गिते आणि या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले विचारवंत व लेखक श्री प्रशांत पोळ यांनी उपस्थिता समोर केलेली वैचारिक मांडणी आणि देशाप्रती प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपले सर्व मतभेद विसरून निष्ठापूर्वक कर्तव्य पार पाडण्यासाठी केलेले आवाहन हे त्यांच्या मांडणीचे मुख्य सुञ होते.
मा. राज्यपाल महोदयांनी आपल्या प्रास्ताविक संबोधनात देशाच्या सीमेवर अहोरात्र झटणाऱ्या आणि देशाच्या संरक्षणासाठी कटीबद्ध असणाऱ्या सैनिकांप्रती आभार व्यक्त करताना एक राखी सैनिकांसाठी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि त्यामुळे मिळालेली प्रेरणा यातून आपल्यात प्रखर राष्ट्रवाद निर्माण होतो आणि त्यातूनच आपल्या हातून समाजासाठी व देशासाठी रचनात्मक काम करण्याची उर्जा मिळते.
कार्यक्रमाला गोव्यातील अनेक जेष्ठ संघस्वयसंसेवक उपस्थित होते. गोव्यात गेली अनेक वर्षे संघपरिवाराच्या कामात ज्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि जे मुळचे सावंतवाडीचे सुपूञ आहेत त्या प्रा. रत्नाकर लेले सरांची भेट पण मला सुखावह वाटली.भारतीय मजदूर संघाच्या कामात जेव्हा मी सक्रिय होतो तेव्हाचे गोव्यातील काही कार्यकर्त्यांची या निमित्ताने भेट झाली. गोव्यातील काही सैनिकी अधिकारी, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक यांच्या उपस्थितीत हा ” एक राखी सैनिकांसाठी ” कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर संपन्न झाला.आदरणीय राजेंद्रजी आर्लैकर साहेब आणि चैतन्य प्रतिष्ठान गोव्याच्या सर्व शिलेदारांचे मनापासून अभिनंदन!

