*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*पाणी.. पाणी.. पाणी…*
क्षणभर कधी कधी असं वाटतं की, पाण्याइतकं
महत्वाचं दुसरं काहीच नाही. पण लगेच लक्षात
येते, हवा? एक क्षणही त्यावाचून आपण जगू
शकत नाही. अन्ना वाचून काही दिवस आपण पाण्यावर राहू शकतो पण पाण्याशिवाय? छे!
शक्यच नाही. देवाने दिले ही महामूर, भरपूर..
म्हणून का आपल्याला त्याची किंमत नाही?
येमेन चिन जर्मनी अफ्रिका बरेच देश पाणी टंचाईला सामोरे जात, काही देश तर विस्थापित
होत परिणामांना सामोरे जात आहेत.इंग्लंडमध्ये
१९९८ पासून माझा मुलगा असल्यामुळे बऱ्याच वेळा दीर्घ
मुकामात त्यांच्या सर्व प्रकारच्या नियोजनाने,
पाणी टंचाई असूनही स्तिमित व्हायला झाले.
काटेकोर नियोजन न रिसायक्लिंग इतके जबरदस्त आहे की चोविसतास शुद्ध पाणी पुरवठा, तो ही पूर्ण इंग्लंडभर केला जातो.सर्व प्रकारचं,
प्लास्टिकसह रिसाक्लिंग तिथे केलं जातं.तुम्ही
म्हणाल देश छोटा आहे, म्हणून काय झालं? आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्तीची काही
कमतरता आहे का? पण नियोजन मात्र शून्य आहे. हो, शून्यच आहे.
मी माझ्या घरातच किती आदळआपट राग राग
करते पण.. मोलकरणी ऐकतील तर शपथ..
त्या त्यांना वाटतं तेच करतात. आपण सांगणारे
त्यांना मूर्खच वाटतो.नळ मग तो पूर्णच उघडायचा, भसाभसा पाणी सांडत कामे करायची
व दुसऱ्या घरी धाव घ्यायची. अर्धा नळ सोडणे
त्यांच्या पचनीच पडत नाही. आपण त्यांना कटकटे वाटतो, कसे प्रबोधन करायचे त्यांचे,
मी तर हात टेकले आहेत. राष्ट्रीय संपत्ती वगैरे
गोष्टी त्यांच्या डोक्यावरून जातात हो!
मी स्वत: काटकसरीने पाणी वापरते, इतरांना वापरायला सांगतेच. माझ्या फार्म हाऊसवर मी
ठिबकसिंचन करून घेतले आहे. बोअरवेलला
भरपूर पाणी असले तरी अनाठाई वापर टळतो.
खरं म्हणजे पाणी ही जगातली अद् भूत गोष्ट
आहे. सर्व प्रकारची कामे करून ते नामानिरळे
होते. ते कुठेच थांबत नाही. इकडून तिकडे त्याचा
अखंड प्रवास चालू असतो. बांधकाम करा, पाणी मारा, ते क्युअर करून पाणी उडून जाते. सर्वत्र त्याची वाफ होते. कपडे वाळतात. कोरडे होतात.
नद्या समुद्र ओढे नाले, सर्वत्र पाण्याची वाफ होते.
एका जागी टिकणे हा त्यांचा धर्मच नाही. ते सतत प्रवाही असते.इकडून तिकडे जात असते.
त्याचे स्वरूपही बदलत असते पाणी वाफ बर्फ
असे ते बदलत असते.
झाडांना पाणी घाला ते जिरते. झाडे वाढतात पण
जास्तीचे पाणी मुळे खोलवर धरून ठेवतात, जमिनीत साठा वाढतो. आपण पाण्याचे हे महत्व
लक्षात घेऊन कटाक्षाने पाणी काटकसरीनेच वापरायला हवे. जर्मनीत पाणी थेंब थेंब वाचवले
जाते व आता सर्वत्र रेनवॅाटर हार्वेस्टिंग केले जाते
ते आपणही केले पाहिजे. बाहेरच्या देशात हे रेन वॅाटरच इतर सर्व कामांसाठी वापरले जाते आहे.
आपल्याकडे आता कुठे शेतकरी शेततळे तळे
करून पिके वाचवायला शिकले आहेत ते ही
प्रमाण वाढले पाहिजेच…
महत्वाचे, नव्हे अति महत्वाचे म्हणजे वने वाढवली व जोपासली गेली पाहिजेत म्हणजे ते
पाऊस खेचून आणतील व दुर्मिक्ष कायमचे नष्ट
होईल. झाडे लावा, वाचवा, वाढवा.. पाणी जपून
वापरा हे मनात ठसले पाहिजे. नाही तर एक दिवस आपल्यावरही विस्थापित व्हायची वेळ
नक्कीच येऊ शकते. इतर जग जागे झाले आहे
आपण मात्र अजून गाफिल व भ्रमात आहोत. हा
भ्रम जितका लवकर दूर होईल तितके बरे.
तरच आपल्याला भविष्य आहे हे लक्षात ठेवा.
तर मंडळी.. झाडे लावा.. पाणी वाढवा नि वाचवा..” थेंबे थेंबे तळे साचे” …
. . पाणी सत्व आहे जीवनाचे…
. .वेळीच महत्व ओळखा त्याचे…
. .नाही तर … भक्ष व्हाल गिधाडाचे…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

