*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
“आई एक विद्यापीठ”
********************
वागणे आईचे । संस्कारांचे देणे।
चालणे बोलणे।शिक्षण असते
गरिबांची दया ।हृदयात वसे
तेच आम्हा असे। संस्कारचे देणे॥१॥
कामाचा उरक ।सदैव हसत
आठी ना पडत। कधी भाळावर
माझी आई आहे। अन्नपूर्णा जशी
वागणे सर्वांशी । अतीव प्रेमाचे ॥२॥
घासातला घास। देण्या शिकवला
आम्ही तो पाळला। न्यायसंस्काराचा
किती किती कामे, आई करतसे
सूची त्याची केली, कमी पडतसे ॥३॥
तूरडाळ करा, हळदीला कुटा
मिरच्यांना कांडा,मिठालाही दळा
शेणाने मातीने,मग भिंती लिंपा
घर सारवून, लखलख करा॥४॥
पंधरा जणांना, रांधूनही वाढा
भोजन घालून, अतिथीला धाडा
उन्हाळ्याची कामे,निवड टिपणे
गोधड्याही मग, आई शिवतसे॥५॥
आजही माहेरी,गोधड्या विविध
एका हाताने त्या,ऊचलून दावा
कधीही चेहरा उदास न दिसे
येणारा जाणारा तृप्त होतसे॥६॥
नऊवारी साडी रंग गोरा गोरा
आजही मलादिसते अशी आई
अशी माझी आई एक विद्यापीठ
अशा गुरुकुलात वाढलो आम्ही॥७॥
+++++++++++++++++
विद्या रानडे

