वैभववाडी पोलिसांची दारू तस्करीवर मोठी कारवाई – ५९.९६ लाखांचा मुद्देमाल जप्त
वैभववाडी (प्रतिनिधी) –
करूळ चेक नाक्यावर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा एक ट्रेलर वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या कारवाईत तब्बल ३६ लाख ९६ हजार रुपयांची दारू आणि २३ लाख रुपयांचा ट्रेलर असा एकूण ५९ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी सकाळी ५.४५ वाजता करण्यात आली.
चालक नवीन सुरेश कुमार (वय २९, रा. कदम, ता. भिवानी, हरियाणा) आणि क्लिनर वीरेंद्र भरतसिंग (वय ४२, रा. अजमपूर, ता. हंसी, हरियाणा) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोव्यातून कोल्हापूरकडे जाणारा १८ चाकी ट्रेलर तपासणीसाठी थांबवण्यात आला असता, चालकाने ट्रेलरमध्ये बायोमास प्युअर ट्रिक्स असल्याचे सांगितले. मात्र, पावती व माहितीमध्ये विसंगती आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. माने यांच्या नेतृत्वाखाली पंचनामा करून ट्रेलर पोलीस ठाण्यात आणण्यात आला.
तपासात ट्रेलरच्या हौदयामध्ये लाकडी भूश्याच्या आड लपवलेले ११०० बॉक्स आढळले. प्रत्येक बॉक्समध्ये ४८ बाटल्या असून, प्रत्येकी ७० रुपये किमतीच्या या गोवा बनावटीच्या दारूची एकूण किंमत ३६.९६ लाख रुपये होती.
ही गेल्या १५ दिवसांतील तिसरी मोठी कारवाई असून, वैभववाडी पोलिसांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रेलरमधून दारूची वाहतूक होत असल्याची घटना उघड झाल्याने राज्यातील दारू तस्करीविरोधातील प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
शहरातील अनेक नागरिकांनी हा ट्रेलर पाहण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. गोव्यापासून वैभववाडीपर्यंत दारूची वाहतूक कशी सुरळीत पार पडली, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, याचा सखोल तपास सुरू आहे.

