फोंडाघाट येथे महसूल विभागाचा शिवछत्रपती कार्यक्रम उत्साहात संपन्न
फोंडाघाट
ग्रामपंचायत फोंडाघाट येथे “श्री शिवछत्रपती महसूल कार्यक्रम” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सरपंच सौ. संजना आग्रे, सर्कल ऑफिसर, तसेच लोरे, घोणसरी, हरकुळ व करंजे बीटचे तलाठी उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कृषी सहाय्यक परब मॅडम, शितल पारकर (रावराणे) तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी हे उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना अजित नाडकर्णी यांनी महसूल विभाग फोंडाघाटच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत, फोंडाघाट गाव मोठे असल्याने येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करण्यात यावा, अशी मागणी केली. सोसायटी चेअरमन श्री. राजन नानचे यांनी यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी ७/१२ फेरफार, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना व युक्त दाखल्यांचे वाटप करण्यात आले. अजित नाडकर्णी यांनी तलाठी कार्यालयावर स्वतः ४०,०००/- रुपये खर्च करून नवीन पत्रे बसवली. त्यांच्या या कार्याची दखल घेत उप तहसीलदारांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
तहसीलदार, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेला हा उपक्रम उल्लेखनीय असून, दर महिन्याला अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा सरपंच सौ. संजना आग्रे यांनी व्यक्त केली.
— अजित नाडकर्णी, संवाद मीडिया

