*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा समूह प्रमुख, वारकरी, लेखक, कवी श्री पांडुरंग वसंत कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*====…..सहजता….====*
सहजता हा एक विशिष्ट प्रकारचा मानवी गुणधर्म आहे. ज्याच्या स्वभावात हा गुण असतो ती व्यक्ती मात्र अगदी सुखी, समाधानी, प्रसन्नचित्त असल्याचे आपणास आढळून येते. मग अशी काय जादू आहे बरे या गुणामध्ये? तो प्रत्येकाच्या स्वभावात असेल तर किती मजा येईल. पूर्ण समाजच सुखी, समाधानी आनंदी होईल. मग हा गुण आपल्या अंगी येण्यासाठी आपण काय करायला हवे?
सहजता हा गुण मानवा व्यतिरिक्त आपणास पाण्यामध्ये सुद्धा दिसून येतो. पाण्याचं वाहणं अगदी सहज असतं. ते कायम उताराकडे असतं. कमीपणा घेण्याकडे असतं. म्हणजेच नम्रतेकडे असतं. वाटेत कितीही अडथळे आले, तरी ते थांबत नाही अगदी हसत खेळत पुढे जातं. त्या अडथळ्याशी, संकटाशी, समस्येशी वाद घालत बसत नाही, तर त्याला वळसा घालून पुढे जातं. हीच ती पाण्याची सहजता. हा पाण्याचा गुण आपण घेतला तर किती भारी होईल. मुळात पाण्याचं नावचं जीवन आहे. जीवन म्हणजे पाणी. आपलं जीवन हे पाण्याप्रमाणेच सहज अपेक्षित आहे. पण आपणास ते तसं ठेवता आलं पाहिजे. पाण्याचा हा गुण आपणास घेता आला पाहिजे. नम्रता, सहजता, समर्पण.
डोंगरावरून ते समुद्रपर्यंत पाण्याचा प्रवास हा उताराकडे असतो. आणि शेवटी समुद्राप्रति समर्पित असतो. इथे पाण्याचे समर्पण उल्लेखनीय आहे. ते स्वतःचे अस्तित्वच संपवून टाकते. त्या समुद्रातल्या पाण्याची सूर्यदेव वाफ करतो आणि ती खरी पाण्याची मोक्ष अवस्था. वाफ रूपाने सूर्य त्यास परत ढग बनवाण्यास मदत करतो आणि परत नवीन पुनर्जन्माने ढगातून पाऊसधारा बरसतात. जल नवीनतेने परत पृथ्वीवर जन्म घेते किंवा अवतारच घेते म्हणा ना, जसे संत, महात्मे अवतार घेतात तसे. पृथ्वीवरील सर्वाना जीवन देतात आणि देणारा तो देव या न्यायाने जलाची पूजा केली जाते. असे आपले जीवन हवे. सहजता, झुकणे, नम्रपणा, समर्पित होणे, त्याग हे गुण पाण्यापासून आपण घेतले पाहिजेत.
कर्म करूनही जणू काही मी काहीच केले नाही. असे होते. माझ्यामुळे कर्म होते हे मलाही समजत नाही अशी अवस्था जेंव्हा प्राप्त होते तेंव्हा ती खरी नैसर्गिक सहजता. यालाच अकर्मता म्हणतात. पहा ना सूर्य उगवतो. तो काही सृष्टीतील प्राणी जीव यांना जीवन देण्यासाठी उगवत नाही तर तो उगवल्यामुळे, त्याच्या उगवण्यामुळे सृष्टीला जीवन मिळते. त्याच्यामुळे हे होते. हे त्यालाही समजत नाही. ही ती सहजावस्था. यालाच अकर्म म्हणतात. संत, महात्मे, साधू, ऋषीं, मुनी, सदाचारी हे असे अकर्मी असतात कारण त्यांच्याकडे सहजता असते. ते संकटे, समस्या, अडचणी, दुःखे यांनाही अगदी सहजतेने घेतात. त्यामुळे त्यांना ते दुःख वाटत नाही. शेवटी आपण कोणतीही गोष्ट कशी घेतो हे महत्वाचे आहे. त्या गोष्टीबद्दल आपली स्वीकृती कशी आहे यावर त्या गोष्टीबद्दलची आपली वृत्ती दिसून येते. सकारात्मकता हा गुण ही इथे फार महत्वाचा आहे. कोणतीही गोष्ट सकारात्मकतेने स्वीकारली पाहिजे. कोणाकडेही काही ना काही चांगले असतेच. तेवढेच आपण घ्यावे. बाकीचे वाईट सर्व सोडून द्यावे. त्याकडे दुर्लक्ष करावे. अशी जगात एकही गोष्ट, व्यक्ती किंवा वस्तू नसेल की त्याच्याकडून घेण्यालायक काही नसेल. अगदी बंद पडकलेलं घड्याळसुद्धा दिवसातून दोनदा बरोबर वेळ दाखवते. आपण राजहंसासारखं असावं. “निरक्षीर विभेदेतु हंसो हंसो बकोबक:!” ती निपुणता आपल्या ठायी आपसूक येते, जर आपण तेथे एकाग्रतेने प्रयत्न करत असू तर. प्रयत्नांती परमेश्वर. ते होणार म्हणजे होणार. फक्त तुमची आर्तता हवी. आरती म्हणजे तरी काय? देवाला आर्ततेने मारलेली हाक असते. त्यात आर्तता असेल तर देव ऐकतो. नसेल तर ते फक्त कर्मकांड किंवा थोतांड असते. असो तर आपण पाणी, राजहंस, इत्यादीकडून बरेच काही शिकून त्यात सहजता आणावी. आर्ततेने, मनापासून केले की हे सर्व काही होते. कर्मात सातत्य हवं. अगदी मऊ पाण्याची संतत धार कठीण दगडावर पडत असेल तर दगडालाही छिद्र पडते. हे आपणा सर्वाना माहित आहेच. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट.
तर अशी ही सहजतेच्या साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतू, कल्याणमस्तु!!!
== *पांडुरंग वसंत कुलकर्णी नाशिक मो. 7769055883*

