*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*घडवितो घट पहा …*
घटा घटाचे भाग्य लिहीतो..तो
देतो आकार.. घडवितो घट पहा कुंभार..
चाकावरती लीलया फिरती
माती घेऊन हाती
मर्दन करूनी मातीचे ते
आकार किती ते बनती..
कुणी घट तर कुणी तो रांजण
पाणी साठवणारं…
घडवितो घट पहा कुंभार …
नशिब वेगळे घटाघटाचे
काय ते माहित नसते
थंडगार ते पाणी कुणाचे
रांजणातही असते
गरीबाघरी तो कुणी जातसे
मुष्किलीनेच तो नेणार…
घडवितो घट पहा कुंभार…
नवरात्रीला घट ते बस्ती
घरोघरी पूजा
दहा दिवस अंकुर वाढती
घट ते हिरवेगार
दसऱ्याला मग होई सांगता
घट ते मिरवणार..
घडवतो घट पहा कुंभार…
कुणी घटाचे नशिबच फुटके
आग घेऊनी जातो
सरणाजवळी कुणी दु:खी तो
मटके ते आपटतो
घडवणारा हात हो एकच
तो तरी काय करणार?
घडवितो घट पहा कुंभार…
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)

