*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रकाश रामचंद्र क्षीरसागर लिखित अप्रतिम लेख*
*मातीची व्यथा मांडणारे कवी : ना. धो. महानोर*
रानकवी नामदेव धोंडो महानोर
विदर्भातील दूर असलेल्या जळगाव जिल्ह्यातील पळसखेड येथे जन्मलेले नामदेव धोंडी महानोर यांनी आपल्या आयुष्यात शेतीभातीची गाणी लिहिली. मातीची व्यथा मांडणारे कवी म्हणून त्यांनी जीवन व्यतित केले. पळसखेड येथेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यावर जळगावच्या मूळजी जेठा महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्याआधी वयाच्या दहाव्या वर्षी शेंदुर्णी गावात त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाले.
घरची अत्यंत गरिबी असल्याने महाविद्यालयाची फी भरणे शक्य न झाल्याने त्यांनी एका वर्षातच शिक्षण सोडले. त्यांची प्रतिभा खूप महान असल्याने त्यांनी खूप गीते लिहिली. सहज सोप्या शब्दात लेखन त्यांनी केले. जोंधळ्याचे भरघोस पीक पाहून जोंधळ्याला चांदणे लखडून यावे अशी शब्दरचना केली.
१९७९ व १९९० मध्ये त्यांची महाराष्ट्र विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती केली होती. निसर्गकवी असा त्यांचा लौकिक होता. निसर्गकवितांमुळे त्यांना रानकवी म्हणून ओळखले जाते.
१६ सप्टेंबर १९४२ रोजी हा हिरा जन्मला. पदवीपर्यंतही शिक्षण झाले नव्हते तरी महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील शेतीचे दुःख त्यांनी जाणले होते. १९९१ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री हा किताब दिला होता. कवी असले तरी गीतकार म्हणून त्यांची प्रतिभा विशेष होती.
जैत रे जैत चित्रपटातील सर्वच गीते गाजली व लोकप्रिय झाली, त्यांनी गद्यलेखन केले असले तरी ते रानकवी म्हणूनच प्रसिध्द झाले, त्यांची गांधारी ही कादंबरी आहे. पण तीकडे फारसे कुणाचे लक्ष गेले नाही. गपसप (१९७२) आणि गावातल्या गोष्टी हे लोककथासंग्रह त्यांनी प्रसिध्द केले. पळसखेडची गाणी या नावाने त्यांनी लोकगीतांचे संकलनही प्रकाशित केले. त्यांच्या रानकविता दूरदेशी गाजल्या आहेत.
मी रात टाकली, लिंबोणीचं लिंबू, दूरच्या रानात केळीच्या बनात, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं. आम्ही ठाकरं ठाकरं ही गीते लोकप्रिय झाली. ही अजरामर गीते आजही नव्या पिढीलाही आकर्षित करतात. जांभूळ पिकल्या झाडाखाली आणि राजसा जवळी जरा बसा ही गीते खेड्यातील व शहरातील रसिकांनाही आव़डतात. ते ती गुणगुणतात.
विधानसभेत त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जलसंधारण, पाणी व्यवस्थापन, ठिबक सिंचन, फळबागा आणि तंत्रज्ञानविषयक प्रश्न त्यांनी मांडले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी मुद्देसूद भाषणे केली.
त्यांची अजिंठा ही दीर्घ कविता सर्वदूर गाजली. कापूस (खोडवा) ही शेतीविषयक कविता आहे. गंगा वाहू दे निर्मळ हा कवितासंग्रह नदीतील प्रदूषणाचा प्रश्न मांडणारी आहे. रानातल्या कविता त्यांनी लिहिल्या. एक होता विदूषक, अबोली, सर्जा, मुक्ता हे त्यांच्या चित्रपटगीताने सजलेले चित्रपट. सोमनाथ दडस यांनी त्यांची काव्यसृष्टी व प्रतिमासृष्टी हे ग्रंथ त्यांच्या जीवनकार्याची माहिती देतात. जागतिक चित्रपट महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०१२ मध्ये भरलेल्या पर्यावरण प्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नंदूरबार येथे भरलेल्या पहिला जिल्हा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. २०१५ मध्ये त्यांना यशवंतराव स्मृती समितीने भगवानराव लोमटे स्मृती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले आहे.
प्रकाश रामचंद्र क्षीरसागर
९०११०८२२९९
