*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा. सदस्य तथा अध्यक्ष कोमसाप सावंतवाडी, लालित्य नक्षत्रवेल प्रशासक लेखक कवी दीपक पटेकर (दीपी) लिखित अप्रतिम ललित लेख*
*अतूट मैत्रीचा बंध*
मैत्री म्हणजे काय…?
खरंच प्रश्न पडतो…
मनातील प्रत्येक गोष्ट… आयुष्यातील सर्व सुखदुःख…अगदी गुपितं सुद्धा नि:संकोचपणे ज्याच्याशी बोलतो… वाटून घेतो…तो मित्र…!
पण मैत्री म्हणजे….?
तुझी सुखदुःख माझी अन् माझी सुखदुःख तुझी यालाच म्हणायची का खरी मैत्री…?
तुझ्या आनंदात मी आनंद मानायचा माझ्या दुःखात तू आधार बनायचा…याला म्हणायची मैत्री…?
प्रेमाने आणलेली बोरं, एक एक चाखून कृष्ण सख्याला दिल्यावर उष्टी बोरं सुद्धा आनंदाने खाणाऱ्या कृष्ण – सुदामाच्या नात्याला म्हणायची मैत्री…?
सत्याची बाजू जाणत असतानाही आपल्याच भावंडांशी असत्याने लढणाऱ्या दुर्योधनाची साथ देणाऱ्या कर्णाच्या मित्रपेमाला म्हणायची मैत्री…?
मी तर म्हणतो, जिथे तुझं अन् माझं असं काहीच नसतं…शब्द मुके असतात तेव्हा हृदयाचे ठोके तुला कळतात…डोळे मी मिटताच माझ्या पापण्यांवरची स्वप्नं तुझ्याशी बोलतात…माझा चेहरा मला तुझ्या चेहऱ्यात दिसतो…जणू तू माझा आरसा असतो…शब्दोशब्दी मी तुझ्या मुखात असतो… जसं शब्दाचं मी प्रतिबिंब बनतो…खरंच, माझ्यासाठी तू म्हणजेच मीच असतो… *मैत्री म्हणजे तुझ्यात मी अन् माझ्यात तू असणं….!*
कुणीतरी म्हटलंय…
*मैत्री म्हणजे काय रे…?*
*दुधावरची साय रे…*
*आपुलकीची ऊब मिळता*
*सहज उतू जाय रे…!*
खरंय, मैत्री दुधावरच्या साय प्रमाणेच असते… खांद्यावर हात पडताच तुझ्या सुखदुःखाची आसवं बनवते…शब्दही न उच्चारता पापण्यांच्या कडा ओलावते… स्पर्श होता मित्राचा मैत्री… दुधावरच्या साय प्रमाणे फेसाळते…उकळ्या फुटून आनंदाने सहज उतू जाते…
सुगंधी फुल हाती धरल्यावर फुलाचा सुगंध बोटांना येतो अगदी तसंच तू सोबत असला की तुझे गुण आपोआप माझ्यात अन् माझे तुझ्या अंगात भिनतात….तुझी माझी मैत्री म्हणजे मृगाच्या नाभीतली कस्तुरी… दूर कितीही राहो…दरवळ चहूकडे पसरेल… खरं सांग मग हे नातं मैत्रीचं कोण कसा विसरेल…?
मैत्री म्हणजे निष्पाप, निरामय भाव…
जिथे कधी नसतो हेवेदावे अन् दुराव्याला वाव…!
मैत्री म्हणजे निर्झराचं स्वच्छ, निर्मळ पाणी…
मैत्री म्हणजे हेलकावे खाऊनही न डगमगणारी नाव…!
प्रश्नांना जिथे नसतो थारा अन् उत्तराला लागत नाही सहारा…
फक्त नजरेत उतरायचं अन् पहायचे डोळ्यातले भाव…!
अशी असावी मैत्री…
तुझ्या मनातील कल्पना सुद्धा न बोलता माझ्या कल्पनेत उतराव्यात…आणि त्या भन्नाट कल्पनेपोटी दोघांनीही स्वप्नांवर स्वार व्हावे…अगदी मागे पुढे न पाहता…एकमेकांत रमून जावे…
सुखदुःख असो वा संकटे…साथ देणारी मैत्रीचं असते…वार होता पाठीवर… ढाल बनून वार झेलणारी सुद्धा मैत्रीचं असते…
*भेटले अनेक दोस्त…पण मैत्र खास शोधतो* अशीच मैत्रीची आजची स्थिती आहे. झाडाला गोड स्वादिष्ट फळे लागतात…दूरदूर वरून पक्षी झाडावर येऊन बसतात… कधी न पाहिलेले गोडबोले तर शिट्ट्या वाजवतात…फळे चाखतात अन् बियांचा चोथा झाडाखाली टाकून बहर संपताच पसार होतात…
मैत्री म्हणतात का याला….?
मैत्री असावी पानगळ झाली तरी झाडावर बहरून, फुलून भर उन्हात तापत राहणाऱ्या देवचाफ्यासारखी…! स्वतः करपून गेला तरी झाडाला एकटा सोडत नाही…
मैत्री असावी पळसाच्या आग ओकणाऱ्या लाल भगव्या फुलांसारखी…पाने गळून धारातीर्थी पडली तरी फांदीची शोभा वाढविणारी…!
मैत्री असावी हिऱ्यासारखी अनमोल… घडवायला कठीण परिश्रम तर असतातच…पण हरवला तरी वेदना जीवघेण्या… मैत्री अशीच असावी…गमाविण्याच्या वेदना असह्य करणारी…!
तुझी माझी मैत्री असावी आयुष्यभराचा अनमोल ठेवा… स्वतःला आनंदी ठेवण्याचे संजीवनी औषध…! तुझ्या माझ्या मैत्रीत जपलं जावं भावनांचं मोल…अन् भरली जावी ओंजळ प्रेमाने जीवनाचा प्रत्येक क्षण…! तुझं माझं नातं असावं अनमोल…जीवनात दाटलेलं मळभ दूर करून स्वच्छ, निरभ्र आसमंत दाखवणारं…!
असे प्रेमळ निर्मळ गोड
मित्रा तुझे नि माझे नाते…
मन भिजता आठवणींत
आनंदाश्रुंची सर बरसते…
मैत्रीच्या नात्यातील गोडवा असा असतो की जेव्हा आठवणी मैत्रीच्या दाटतात हृदयी तेव्हा गालावरी आनंदाश्रूंची सर बरसते…डोळ्यात मित्राची छबी तरळते…हास्य ओठांवरी अन् मन मित्रापाशी पोचते…
*पापान्नीवारयति योजयते हिताय*
*गुह्यं च गूहति गुणान् प्रकटीकरोति!*
*आपद्गतं च न जहाति ददाति काले*
*संमित्रलक्षणमिदं प्रवदन्ति संतः!!*
जो पाप कर्मापासून वाचवतो, वाईट मार्गास जाण्यापासून रोखतो…तो मित्र…अन् तीच मैत्री…
हितकार्यार्थ जोडतो…म्हणजे, आई आपल्या बाळाला सुखाच्या गोष्टी सांगत नाही तर हिताच्या गोष्टी सांगते…मैत्री तीच जी सुखकारक गोष्टी न सांगता हितकारक गोष्टी सांगते…
माझी चूक झाल्यावरही मला समजून घेईल…माझे गुपित गुपितच ठेवतो..म्हणजे त्याचे मित्रावरील प्रेमही कमी होणार नाही अन् गुपित सुद्धा सुरक्षित राहील…
आपल्या छोट्याशा गुणांना चारचौघात सांगताना मोठे करून सांगतो… सन्मित्र तोच ज्याला भेटल्यावर आपल्या अंतरीचे गुण फुलतात…बहरतात…तीच मैत्री जी मित्राचे जीवन सुंदर बनविण्यासाठी प्रयत्नशील असते…
मित्राला कधीही संकटात सोडून जात नाही तर निराश मनाला आशेचा किरण दाखवतो…मैत्री संकटांशी सामना करण्याची हिम्मत देते…निडर बनविते…
प्रेमाची, मायेची, ऊबेची गरज असते तेव्हा मैत्रीत उष्मा भरते…उभारी देते ती मैत्री…!
मैत्री म्हणजे हिरवेगार रान…जिथे मिळतो मित्राच्या सावलीत गारवा छान…! हाती हात घेउनी मित्राचा, चालता खडतर वाट… नक्कीच उगवेल आयुष्यात, एक सोनेरी सुंदर पहाट…!
©दीपक पटेकर [दीपी]
सावंतवाडी
८४४६७४३१९६
